पिंपरी : चिखली, कुदळवाडीतील आगीनंतर महापालिका प्रशासनाने या भागातील गोदामांचे सर्वेक्षण केले आहे. या परिसरात चार हजार ६६२ व्यावसायिक आस्थापना असून, अनधिकृत गोदामे आणि अग्नी प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे दुर्लक्ष करणाऱ्या गोदाममालकांना नोटीस देण्यात आली आहे. यापूर्वीच तीन नोटीस दिलेली गोदामे सोमवारपासून लाखबंद (सील) केली जाणार आहेत.

कुदळवाडीतील अग्नितांडवानंतर तळवडे, चिखली, जाधववाडीसह शहरातील विविध भागांतील गोदामे, व्यावसायिक आस्थापनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सुमारे १५० एकर परिसरात ही अनधिकृत गोदामे, व्यावसायिक आस्थापना आहेत. कुदळवाडीतील चार एकर क्षेत्रफळावर वसलेल्या गोदामांवरील आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशामक दलाला चार दिवस लागले. तरीही काही ठिकाणी आग धुमसतच आहे. या आगीत ३५ गोदामे जळाली आहेत.

हेही वाचा – जो तंदुरुस्त तोच मॅटवर टिकणार – शिवम पठारे

कुदळवाडी परिसरात असलेल्या भंगार गोदामांना वारंवार आगी लागतात. भंगाराची गोदामे किती आहेत, याचे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणात आढळलेल्या सर्व आस्थापनांना पत्र देऊन अग्नी प्रतिबंधक उपाययोजना करण्यास सांगण्यात आले. मात्र, अनेक आस्थापनांनी नोटिशीकडे दुर्लक्ष केले. संबंधितांना दोन नोटीस देण्यात आल्या आहेत. तीन नोटिसा दिल्यावरही उपाययोजना न करणाऱ्या आस्थापनांचा पाणीपुरवठा आणि वीजपुरवठा खंडित करून लाखबंद करण्याची कारवाई केली जाणार आहे.

अग्नी प्रतिबंधक उपाययोजनांकडे दुर्लक्ष

कुदळवाडी, तळवडे परिसरातील चार हजार ६६२ आस्थापनांचे सर्वेक्षण झाले. त्यांपैकी अग्नी प्रतिबंधक उपाययोजनांबाबत चार हजार ५१२ आस्थापनांना नोटिसा दिल्या आहेत. उपाययोजना केलेल्या २४४ आस्थापनांना अग्निशामक विभागाने ना हरकत दाखला दिला आहे. चार हजार २६८ आस्थापनांनी अग्नी प्रतिबंधक उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले. त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

आगीच्या घटनांमध्ये वाढ

चिखलीतील कुदळवाडी परिसरातील गोदामांमध्ये प्लॅस्टिक, लाकूड, रबर, टायर, फायबर, केमिकल असे विविध प्रकारचे भंगार साहित्य आहे. या भागातील सर्व गोदामे अनधिकृत आहेत. या गोदामांना सातत्याने आग लागण्याचे प्रकार घडतात. सन २०२० मध्ये ३०, २०२१ मध्ये ४१, २०२२ या वर्षात ४४, २०२३ मध्ये ५८ आणि २०२४ मध्ये ऑक्टोबरअखेर ४४ आगीच्या घटना घडल्या आहेत.

हेही वाचा – “कुठल्या नेत्याला जेलमध्ये टाकायचं, कोणाला कुठलं खातं द्यायचं हे…”, रावसाहेब दानवे नेमकं काय म्हणाले?

कुदळवाडी परिसरातील अनधिकृत आस्थापनांना नोटीस देण्याचे काम सुरू आहे. ज्या आस्थापनांना यापूर्वीच तीन नोटिसा दिल्या आहेत, त्या आस्थापनांवर सोमवारपासून कारवाई केली जाणार आहे असे अग्निशामक विभागाचे उपायुक्त मनोज लोणकर यांनी सांगितले. तर, कुदळवाडी येथील भंगार गोदामांना लागलेली आगीची घटना आपत्ती आहे. या घटनेचे राजकीय भांडवल करू नये. निःपक्षपातीपणे चौकशी करण्यात यावी. कुदळवाडीत अग्निशामक दलाचे केंद्र उभारावे. सुरक्षेचे नियमितपणे लेखापरीक्षण करावे अशी सूचना राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी महापालिका आयुक्तांना केली आहे.

Story img Loader