भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर टीका करण्यात आल्याने पिंपरीतील भाजप कार्यकर्त्यांनी बुधवारी ‘सामना’ वृत्तपत्राचे अंक जाळले. गडकरी समर्थक गटाकडून झालेल्या या आंदोलनाची प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून या घटनेचा अहवाल शहर शाखेकडून मागवला आहे.
नितीन गडकरी व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसंदर्भात शिवसेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘सामना’च्या अग्रलेखात गडकरी तसेच राज ठाकरे यांच्यावर खरपूस टीका करण्यात आली. त्यावरून पिंपरी भाजपमध्ये असलेल्या गडकरी समर्थक कार्यकर्त्यांनी सामनाचे अंक जाळले. नगरसेवक शीतल शिंदे, अनूप मोरे आदींच्या नेतृत्वाखाली पिंपरी चौकात हे आंदोलन झाले. त्याचे तीव्र पडसाद पक्षातच उमटले. भाजप शहराध्यक्ष सदाशिव खाडे व अमर साबळे यांच्या उपस्थितीत संघटनात्मक बांधणीसाठी झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत या घटनेचा निषेध करण्यात आला. ‘सामना’चे अंक जाळण्यात आल्याची माहिती फडणवीस यांच्यापर्यंत गेली असता, त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. या आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांची माहिती तसेच घटनेचा अहवाल त्यांनी मागवला आहे. यासंदर्भात, शहराध्यक्ष खाडे म्हणाले, या आंदोलनाशी शहर भाजपचा काहीही संबंध नाही. आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो. प्रदेशाध्यक्षांनी याबाबतचा अहवाल मागितला असून दोषींवर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा