भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी व पक्षाचे ‘लोकनेते’ गोपीनाथ मुंडे यांच्यातील तीव्र संघर्षांमुळे प्रदेशाध्यक्ष सुधीर  मुनगंटीवार यांच्या फेरनिवडीचा विषय रखडला आहे. मात्र, त्या वादाचा आणि प्रदेश भाजपमध्ये असलेल्या सध्याच्या परिस्थितीचा थेट फायदा सुधीर मुनगंटीवार यांची कृपादृष्टी लाभलेले पिंपरी भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ पवार यांना झाला असून मुदत संपल्यानंतर अघोषित मुदतवाढ मिळाली आहे.
प्रदेशाध्यक्षपदी मुनगंटीवार यांना पुन्हा बसवण्यासाठी गडकरी यांनी शड्डू ठोकले असतानाच ‘दुसऱ्या कोणालाही संधी द्या पण मुनगंटीवार नकोत’ अशी भूमिका मुंडे यांनी घेतली आहे. त्यामुळे राज्य भाजपमधील वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळे  प्रदेशाध्यक्ष निवडीचा विषय प्रलंबित आहे. मात्र, नेत्यांच्या या वादात िपपरीचे बहुचर्चित शहराध्यक्ष पवार मुदत संपल्यानंतरही पदावर विराजमान आहेत. बहुतांश पदाधिकाऱ्यांचा विरोध असतानाही त्यांची २००९ मध्ये शहराध्यक्षपदावर वर्णी लागली. सुरुवातीपासूनच पवारांची कारकीर्द वादाच्या भोवऱ्यात आहे. पक्ष कार्यकारिणी होण्यास सहा महिने लागले. सुकाणू समितीसाठी वर्ष गेले. बैठका झाल्या नाहीत. आंदोलनांमध्ये दुफळी राहिली. पालिका निवडणुकीत पक्षाची बेअब्रू झाली. मात्र त्यानंतरही फारसा फरक पडला नाही. सदस्य नोंदणीला अल्प प्रतिसाद मिळाला. प्रभाग अध्यक्ष व मंडलाध्यक्षांच्या निवडणुका रखडल्या की जाणीवपूर्वक रखडवल्या गेल्या. त्यामुळे शहराध्यक्षपदाची निवड लांबणीवर पडली.
वास्तविक पवारांना पुन्हा शहराध्यक्ष व्हायचे असल्याने त्यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. मुनगंटीवारांचा त्यांना मोठा आधार असल्याचे पक्षात बोलले जाते. ‘सुधीरभौ’ पुन्हा पदावर बसल्यास आपलाही मार्ग मोकळा, अशी पवारांची खात्री आहे. मात्र, मुंडे समर्थक बाळासाहेब गव्हाणे, सदाशिव खाडे, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांचे खास विश्वासू नामदेव ढाके यांची नावे चर्चेत आहेत. गडकरी यांची विशेष मर्जी असलेले व मुंडे गटाशी जुळवून घेतलेल्या अ‍ॅड. सचिन पटवर्धन यांना याहीवेळी पदवीधर विधानसभा मतदारसंघातून लढण्याची संधी अवघड असल्याने ते शहराध्यक्षपदासाठी आग्रही आहेत.
 सरचिटणिसावर कारवाई अन् शहराध्यक्षांवर पांघरूण
शहर भाजपात तीव्र गटबाजीची परंपरा आहे. मामनचंद आगरवाल, वसंत वाणी, दादा ढवाण, डॉ. प्रतिभा लोखंडे, माउली लोंढे, अंकुश लांडगे, भगवान मनसुख, एकनाथ पवार यांच्या कालावधीत कायम गटबाजीचे राजकारण रंगल्याचे दाखले आहे. मात्र, पक्षाची जितकी वाताहात पवारांच्या काळात झाली, यापूर्वी ती कधी झाली नव्हती. पवारांना कोणाची साथ मिळाली नाही. मात्र, प्रदेशाध्यक्षांनी खंबीर पाठबळ दिले. मोबाईलवरील संभाषण संघ अधिकाऱ्यांना स्पीकरवर ऐकवले म्हणून सरचिटणीस महेश कुलकर्णी यांना तातडीने पदावरून काढण्याची कारवाई करणाऱ्या मुनगंटीवारांनी शहराध्यक्षांच्या वादग्रस्त ‘एसएमएस’ प्रकरणावर सरळसरळ पांघरूण घातले, असे उदाहरण कार्यकर्त्यांकडून दिले जाते.

Story img Loader