पिंपरी : भाजपचे पिंपरी विधानसभा प्रमुख अमित गोरखे यांना भाजपकडून विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर झाली आहे. गोरखे निवडून आल्यास शहराला विधानसभेचे तीन आणि विधानपरिषदेचे दोन असे पाच आमदार मिळणार आहेत.
लोकसभा निवडणुकांचे निकाल लागताच राज्यात विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. उद्या २ जुलै उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. आज गोरखे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
हेही वाचा – विजयानंतर जल्लोश करणाऱ्या नागरिकांना धमकावणारा तोतया पोलीस अटकेत
कोण आहेत अमित गोरखे?
गोरखे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील आहेत. गेल्या ४० वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यास आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष आहेत. मातंग समाजाचे महाराष्ट्राचे उच्चशिक्षित युवा नेतृत्व, एम.ए (सामाजिक शास्त्र), एमबीए (एचआर) पर्यंतचे उच्च शिक्षण घेतले आहे. पिंपरी-चिंचवड क्षेत्रात नोव्हेल शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून शैक्षणिक क्षेत्रात काम आहे. अनुसूचित जातीतील शैक्षणिक कार्यासाठी भारत सरकारचा राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते, राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा सन्मान झाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी लहानपणापासूनची नाळ असून प्रथम वर्ग शिक्षित आहेत. न्यूज पेपर विक्रेता ते विधान परिषद सदस्य पदासाठीचे नॉमिनेशन असा प्रवास आहे.
अत्यंत गरिबीतून उभे राहिलेले दलित समाजाचे युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. भाजपाकडून प्रदेश सचिव तसेच पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अशी सध्याची जबाबदारी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या गैरव्यवहारानंतर चार महिन्यांच्या कालावधीमध्ये महामंडळ स्थिरस्थावर करण्याचे काम त्यांनी केले पण कालावधी फक्त चार महिन्यांचा मिळाला.