पिंपरी : केंद्रीय रेल्वे बोर्डच्या ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ या संकल्पनेंतर्गत आकुर्डी रेल्वे स्थानक येथे ‘बोगी – वोगी’ रेस्टॉरंट सुरु करण्यात आले आहे. हे रेस्टॉरंट वापरातून काढून टाकलेल्या रेल्वे डब्यात तयार केले असल्याने त्याला बोगी वोगी, असे नाव देण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या रेस्टॉरंटमध्ये ४४ जणांना बसण्याची सोय असून प्रवाशांना शाकाहारी आणि मांसाहारी असा दोन्ही जेवणांचा आस्वाद घेता येतो. त्याचबरोबर चहा, कॉफी, मॉकटेल, नाश्ता, साऊथ इंडियन, चायनीज या खाद्यपदार्थांचा आस्वादही रेल्वे प्रवाशांना घेता येणार आहे. मुंबईतील ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ सुरू झाल्यापासून आजतागायत हजारो प्रवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत यामधील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आकुर्डी रेल्वे स्टेशन येथे हे ‘बोगी – वोगी’ रेस्टॉरंट सुरु करण्यात आले असल्याची माहिती संचालक नितीन चौगुले यांनी यावेळी दिली.

हेही वाचा – पुणे : रेल्वे प्रवाशांचा स्थानकावरील प्रतिक्षाकाळ कमी होणार, आराखडा अंतिम टप्प्यात

आर्किटेक्चर मंदार पोकळे यांच्या संकल्पनेतून सदर ‘बोगी – वोगी’ या ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ची उत्तमरीत्या रंगरंगोटी केली गेली आहे. आतमध्ये अतिशय सुंदररित्या आसनव्यवस्था, डेकोरेशन करण्यात आली आहे. यामध्ये बोगीच्या दर्शनी भागात भक्ती-शक्ती शिल्प, मोरया गोसावी मंदिर, रावेत येथील जगद्गुरू तुकाराम महाराज हँगिंग ब्रिज आणि पिंपरी-चिंचवड पुणे मेट्रो, आकुर्डी रेल्वे स्थानकाचे स्कायलाईन तयार करण्यात आली आहे. तसेच पुणे स्टेशनच्या निर्मितीचे जुने छायाचित्र व त्यासंदर्भातील माहितीही ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

संचालक नितीन चौगुले म्हणाले, रेस्टॉरंटमध्ये ११ टेबलसह ४४ जणांना बसण्याची उत्तम सोय करण्यात आली आहे. प्रवाशांना शाकाहारी आणि मांसाहारी असा दोन्ही जेवणांचा आस्वाद घेता येणार आहे. विशेष म्हणजे ही सेवा प्रवाशांसाठी २४ तास म्हणजेच रात्रीही उपलब्ध राहणार आहे. रेल्वे-थीम असलेल्या या रेस्टॉरंटमध्ये स्वादिष्ट आणि हायजेनिक अन्नाचा आस्वाद घेऊ शकता तेही अगदी माफक दरात तसेच या ठिकाणी प्रवाशांना २४ तास दिवसरात्र अविरत सेवा दिली जाणार आहे. त्याचबरोबर प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने याठिकाणी सुरक्षारक्षकाचीही नेमणूक केली आहे.

हेही वाचा – सावधान! मद्यसेवन करून वाहन चालवत आहात ? पोलिसांबरोबर आरटीओ करणार कारवाई

आकुर्डी रेल्वे परिसरात अनेक शाळा, महाविद्यालये आहेत. अनेकदा रात्रीच्या वेळी हॉटेल्स बंद झाल्याने विद्यार्थ्यांची जेवणाची गैरसोय होते. त्यामुळे रेल्वे प्रवाशांबरोबरच येथील स्थानिक विद्यार्थी वर्ग आणि नागरिकांनादेखील या रेस्टॉरंटचा फायदा होईल. तेदेखील रेस्टॉरंटच्या जेवणाचा निश्चित आस्वाद घेतील, असेही चौगुले म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri bogie vogie restaurant at akurdi railway station pune print news ggy 03 ssb