पिंपरी- चिंचवड: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेणाऱ्या बुकीला पिंपरी-चिंचवडच्या गुंडाविरुद्ध पथकाने अटक केली आहे. आरोपीकडून ७१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तीन मोबाईल, रोख रक्कम यांचा समावेश आहे. नरेश परसाराम तोलानी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. निलेश उर्फ निलू राम रखीयानी याचा पोलीस शोध घेत आहेत.
सविस्तर माहिती अशी की, दुबईमध्ये चॅम्पियन ट्रॉफीचे भारतीय क्रिकेट संघाचे सामने खेळवले जात आहेत. मंगळवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा क्रिकेट सामना रंगला होता. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केल आहे. याच क्रिकेटच्या सामन्यावर बेटिंग घेणाऱ्या बुकीवर गुंडाविरोधी पथकाने छापा टाकून बेड्या ठोकल्या आहेत. नरेश तोलानी आणि निलेश रखीयानी हे पिंपरीतील रविकिरण सोसायटी साधू वासवानी पार्क फ्लॅट नंबर – ०४ येथे बेटिंग घेत होते. मंगळवारी संध्याकाळी साडेसहा वाजता त्या ठिकाणी कारवाई करण्यात आली. पिंपरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगताप, श्याम बाबा, यांच्या टीमने केली आहे.