अनेक अडचणी भेडसावत असतानाही पिंपरी महापालिकेने ‘बीआरटी’च्या ४५ किलोमीटर मार्गाचे नियोजन केले आहे. फेब्रुवारीत हा पहिला टप्पा पूर्णपणे कार्यान्वित होईल, असे गृहीत धरून त्यानंतर १०० किलोमीटर अंतरापर्यंत ‘बीआरटी’चा विस्तार करण्यात येणार आहे. तथापि, पहिल्याच टप्प्यातील नियोजनाचा बोऱ्या वाजला असताना, मोठय़ा प्रमाणातील खर्च व सुरक्षिततेच्या मुद्दय़ांवर मौन बाळगून ‘पुढचे पाढ व मागचे सपाट’ या पध्दतीने काम सुरू असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.
पिंपरी पालिकेचे पहिल्या टप्प्यात ४५ किलोमीटर अंतराचे ‘बीआरटी’चे नियोजन आहे. पाच सप्टेंबर २०१५ला सांगवी-किवळे या साडेचौदा किलोमीटरच्या पहिल्या मार्गाचे उद्घाटन झाले. आता नाशिकफाटा-वाकड हा आठ किलोमीटरचा दुसरा मार्ग सज्ज आहे. दापोडी-निगडी दरम्यानचा साडेबारा किलोमीटरचा तिसरा मार्ग जानेवारीत सुरू करण्यात येणार आहे. काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता या साडेबारा किलोमीटर मार्गाचे भवितव्य चिंचवड एम्पायर इस्टेटच्या रखडलेल्या उड्डाणपुलावर अवलंबून आहे. सुरक्षिततेच्या मुद्दयावरून बीआरटीला तीव्र विरोध होत असून त्यासाठी अनेक आंदोलने झाली आहेत. खर्चाचे आकडे दिवसेंदिवस मोठे होत आहेत, त्यावर कोणाचे नियंत्रण नाही. मुंबई-पुणे महामार्गावरच असलेल्या निगडी-दापोडी महामार्गावरील सध्याची वाहनांची गर्दी पाहता तेथे वाहतुकीचे नियोजन व सुरक्षिततेच्या विविध मुद्यांवर विस्ताराने चर्चा होण्याची गरज आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. काळेवाडी-देहू रस्त्याच्या मध्यभागी एम्पायर इस्टेटच्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. आर्थिक कारणावरून गेल्या काही महिन्यांपासून ते काम रखडले आहे. ते मार्गी लावल्याशिवाय, या मार्गावरील बीआरटी पूर्ण करणे अवघड आहे. मात्र, अधिकारी व कंत्राटदाराचे संगनमत झाल्याचे चित्र आहे. बीआरटीतील सर्व अडथळे दूर करून फेब्रुवारी २०१६ पर्यंत ४५ किलोमीटर बीआरटी मार्ग सुरू करणार असल्याचे सांगण्यात येते. प्रस्तावित १०० किलोमीटर ‘बीआरटी’साठी आवश्यक रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली आहेत. देहू-आळंदी, बोपखेल-आळंदी, भक्ती-शक्ती ते किवळे, नाशिक फाटा ते मोशी, टेल्को रस्ता, चिंचवडगाव-हिंजवडी दरम्यान विस्तारित बीआरटीचे नियोजन आहे. नाशिक फाटा ते मोशी रस्ता पालिकेने करायचा की राष्ट्रीय महामार्ग रस्ते महामंडळाने करायचा, हा तिढा आहे. भक्ती-शक्तीलगतच्या मार्गावर रेल्वेवरून जाणारा पूल उभारण्यात येणार आहे, त्याची निविदा प्रक्रिया रखडली आहे. पालिका निवडणुकांपूर्वी प्रकल्प पूर्ण करून सत्ताधाऱ्यांना श्रेय घ्यायचे आहे, त्यातून बरेच राजकारणही सुरू आहे. अशा अडचणी असल्या तरी लवकरात लवकर १०० किलोमीटर बीआरटी मार्गी लावू, असा विश्वास पालिकेकडून व्यक्त करण्यात येतो आहे.

‘बीआरटी’च्या पहिल्या टप्प्यातील कामात कोणतीही अडचण नाही. काही ठिकाणी जागा ताब्यात नाही, तर चिंचवडला पुलाचे काम सुरू आहे, अशा अडचणी असल्या तरी त्यातून मार्ग काढण्यात येईल. रस्त्यांसाठी अधिक खर्च झाला, असे म्हणता येणार नाही. बीआरटी यशस्वी व्हावी, यासाठी अभ्यासपूर्ण नियोजन करण्यात आले आहे.
– ज्ञानदेव जुंधारे, कार्यकारी अभियंता, पिंपरी पालिका

Story img Loader