पिंपरी : निवडणूक विभाग आणि पिंपरी -चिंचवड पोलिसांच्या संयुक्त पथकाने २७ लाखांची रोख रक्कम पकडली आहे. वाकडमध्ये मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
मावळ लोकसभा मतदारसंघासाठी १८ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. महायुती, महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे प्रचाराला वेग आला आहे. राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. त्यासोबतच प्रशासनाने देखील जोरदार तयारी केली आहे. विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात येत आहे.
हेही वाचा – पुणेकरांचा हवाई प्रवास सुसाट! विमानतळावरून तब्बल ९५ लाख प्रवाशांचे ‘उड्डाण’
निवडणूक विभाग आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या संयुक्त पथकाकडून वाकडमध्ये नाकाबंदी सुरू होती. त्यावेळी मुंबईकडून वाकडच्या दिशेने एक चारचाकी मोटार येत होती. पथकाने मोटारीची तपासणी केली. त्यावेळी मोटारीत रोकड मिळून आली. मोटारीतील व्यक्ती व्यावसायिक असल्याचे सांगत असून त्याला त्याच्याकडे असलेल्या रोख रकमेबाबत माहिती देता आली नसल्याने रोकड आणि मोटार जप्त करण्यात आली आहे.