भोसरी मध्ये अकरा वाहनांची तोडफोड करण्यात आली होती

पिंपरी- चिंचवड मधील भोसरी मध्ये अज्ञात पाच व्यक्तींनी अकरा चार चाकी वाहनांची तोडफोड केली होती. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतल आहे. सर्व सामान्य नागरिकांच्या वाहनांची तोडफोड करणाऱ्या चौघांची धिंड काढून नागरिकांच्या समोर पोलिसांनी आरोपींना चांगला चोप दिला. नागरिकांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी आरोपींची घटनास्थळावरून धिंड काढण्यात आली. या कृतीच सर्वसामान्य नागरिकांकडून कौतुक होत आहे.

करण बाळू ससाणे, संकेत दत्तात्रय पडर, करण अमोल ससाणे आणि प्रेम रवी गिरी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव असून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन ते दिन दिवसांपूर्वी भोसरी मधील आदिनाथ नगर, गव्हाणे वस्ती परिसरात काही अज्ञात व्यक्तींनी कोयता आणि दगडाने वाहनांची तोडफोड केली होती. घटनेची माहिती मिळताच भोसरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मद्यपान केलेल्या काही जणांनी तोडफोड केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता.

आदिनाथ नगर आणि गव्हाणे वस्ती येथे रस्त्यावर पार्क केलेल्या चार चाकी वाहनांना लक्ष करत दोघांनी कोयता आणि दगडाने वाहनांची तोडफोड केली. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच पुन्हा एकदा नुकसान झालं. पिंपरी- चिंचवड शहरामध्ये वाहन तोडफोडीचे प्रकरण हे काही नवीन नाही. या आधी देखील अनेकदा वाहन तोडफोडीचे प्रकार घडलेले आहेत. अखेर याप्रकरणी भोसरी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतल आहे. चौघांची घटनास्थळावरून धिंड काढत नागरिकांच्या समोर दांडक्याने चोप दिला आहे. या कृतीच सर्वसामान्य नागरिकांकडून कौतुक होत आहे.