पिंपरी-चिंचवडमध्ये माणूसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. ८५ वर्षीय वृद्ध महिलेवर २३ वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी २३ वर्षीय नराधम आरोपीला अटक केली आहे. ओम जयचंद्र पुरी वय- २३ वर्षे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पीडित ८५ वर्षीय वृद्ध महिला त्यांच्या राहत्या फ्लॅटच्या समोरील मोकळ्या जागेत शतपावली करत होत्या. आरोपी ओम पुरी हा अचानक पाठीमागून आला. त्याने वृद्ध महिलेचे तोंड दाबून धरलं आणि जिन्यातून फरपटत नेऊन जिन्याच्या मोकळ्या जागेत जबरदस्ती करून बलात्कार केला. वृद्ध महिलेला जिवे मारण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. घटनेनंतर आरोपी फरार झाला.
हेही वाचा – आळंदी: इंद्रायणी नदीत ‘ती’ मृत्यूची वाट पाहत बसली; पण नियतीला काही वेगळच…
हेही वाचा – गर्दी जमविण्यासाठी भाजप ‘दक्ष’; गडकरींच्या सभेला अल्प उपस्थितीनंतर पदाधिकाऱ्यांना जाग
बराच वेळ झाला वृद्ध महिला घरी न आल्याने घरातील व्यक्तीने शोधाशोध केल्यानंतर जिन्याच्या खाली असलेल्या मोकळ्या जागेत त्या पडलेल्या दिसल्या. त्यांच्या ओठातून रक्त येत होतं. मुलीला सर्व हकीकत सांगितल्यानंतर मुलगी देखील काही वेळ स्तब्ध राहिली. पीडित महिलेला तात्काळ रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. अखेर या घटनेप्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीला अटक केली.