लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये लढतींचे चित्र स्पष्ट झाले असून, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादींत, तर चिंचवड आणि भोसरीत राष्ट्रवादी (शरद पवार) विरुद्ध भाजप अशी लढत होणार आहे. दरम्यान, तिन्ही मतदारसंघ राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला गेल्याने शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करून महाविकास आघाडीचे काम करणार नसल्याचा इशारा दिला आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाची ताकद आहे. त्यामुळे तिन्ही मतदारसंघांवरून दोन्ही पक्षांत मोठी रस्सीखेच सुरू होती. शिवसेना (ठाकरे) पक्षाला भोसरीलगतच्या खेड-आळंदी मतदारसंघाची जागा सोडून शहरातील तिन्ही जागा घेण्यात राष्ट्रवादी (शरद पवार) पक्ष यशस्वी ठरला. या पक्षाने तीन माजी नगरसेवकांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. पिंपरीतून माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत उमेदवार असून, त्यांचा सामना राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे उमेदवार अण्णा बनसोडे यांच्याशी होणार आहे.
आणखी वाचा-ऐन दिवाळीत विजांची रोषणाई आणि पावसाची झडही? कसे असणार हवामान?
चिंचवडमधून राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडून लढण्यासाठी राहुल कलाटे, नाना काटे, चंद्रकांत नखाते इच्छुक होते. त्यापैकी कलाटे यांच्या उमेदवारीसाठी शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ताकद लावली. त्यामुळे कलाटे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. तीन वेळा अपयश आल्यानंतर कलाटे आता चौथ्यांदा नशीब आजमावणार आहेत. त्यांचा सामना पारंपरिक विरोधक जगताप कुटुंबातील भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्याबरोबर आहे. मात्र, नाना काटे अपक्ष म्हणून उभे राहण्याच्या तयारीत असल्याने कलाटे यांचा मार्ग सोपा नाही.
आणखी वाचा-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आता आंतरराष्ट्रीय स्तरावर… चार देशांत होणार विद्यापीठाचे केंद्र
भोसरी मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षातून राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात आलेले अजित गव्हाणे, भाजपमधून शिवसेनेत (उद्धव ठाकरे) आलेले रवी लांडगे दोघेही इच्छुक होते. अखेरीस हा मतदारसंघ राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला गेला असून, गव्हाणे यांची लढत भाजपचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्याशी होणार आहे. गव्हाणे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असून, लांडगे तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. पक्षाला जागा न मिळाल्याने शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) रवी लांडगे काय भूमिका घेतात, याकडे भोसरीकरांचे लक्ष आहे.