पिंपरी : बनावट पोलीस पडताळणी प्रमाणपत्र देणार्‍या टोळीचा पिंपरी-चिंचवड दहशतवाद विरोधी शाखेने (एटीबी) पर्दाफाश केला आहे. दोन मध्यस्थ आणि त्याच्या साथीदारांवर दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही टोळी कंपन्यांमध्ये काम करणार्‍या कामगारांकडून पैसे घेऊन त्यांना बनावट पोलीस पडताळणी प्रमाणपत्र पाठवत होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्यस्थ संदीप बनसोडे (रा. लोहगाव), सुनील रोकडे (रा. पिंपळे गुरव) आणि त्यांना मदत करणार्‍या इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड दहशतवाद विरोधी शाखेचे पोलीस शहरातील लष्करी, सरकारी तसेच महत्वाच्या खासगी आस्थापनांमध्ये काम करणार्‍या खासगी व्यक्तींची माहिती जमा करीत आहेत. दिघी येथील टीसीएल कंपनीमध्ये काम करणार्‍या वाहन चालक, साफसफाई कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि इतर कर्मचार्‍यांची पोलीस पडताळणी प्रमाणपत्रांची तपासणी करीत होते. त्यावेळी त्यातील काही कामगारांकडे बनावट पोलीस पडताळणी प्रमाणपत्र असल्याचे आढळून आले.

हेही वाचा…पिंपरी : चिखलीतील गोदामांच्या आग प्रकरणी जागा मालकाचा शोध

कर्मचार्‍यांकडे चौकशी केली असता त्यांनी दोन मध्यस्थाना १२०० ते १६०० रुपये देऊन हे प्रमाणपत्र घेतल्याचे आढळले. एकूण ४१ पोलीस पडताळणी प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून आले. हे प्रमाणपत्र बनावट असल्याची कल्पना संबंधित कामगारांना नव्हती. सहकारी मित्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कंपन्यांमधील कामगार आरोपींच्या भ्रमणध्वनीवर संपर्क करत होते. त्यांना आवश्यक कागदपत्रे भ्रमणध्वनीवर पाठवली जात. त्यानंतर १५ दिवसात संबंधित कामगाराच्या भ्रमणध्वनीवर पोलीस पडताळणी प्रमाणपत्र येत असे. आरोपींनी सन २०२१ ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत हा प्रकार केला आहे. आस्थापनेत काम करणार्‍या कामगारांचे पोलीस पडताळणी प्रमाणपत्र खरे आहे का, याची खातरजमा संबंधित आस्थापना चालकांनी जवळचे पोलीस ठाणे, पोलीस आयुक्त कार्यालय अथवा दशतवाद विरोधी शाखेतून करून घ्यावे, असे
आवाहन पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad anti terrorism branch exposed gang of fake police verification certificates pune print news ggy 03 sud 02