बाळासाहेब जवळकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
निवडणुकांच्या तोंडावरच वाद कसे उफाळून येतात
पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पक्षामध्ये नव्या-जुन्यांमध्ये पुन्हा धुसफूस सुरू झाली. नव्याने पक्षात आलेल्यांवर पूर्णपणे विसंबून न राहता निष्ठावंतांकडे पक्षसंघटनेची जबाबदारी दिली पाहिजे, असा सूर निघू लागला आहे. वास्तविक, जुन्यांवर खरेच अन्याय होतोय की त्याचे भांडवल करून स्वत:ची राजकीय पोळी भाजण्याचे काम सुरू आहे, याविषयी साशंकता आहे. दुसरीकडे, पार्थ अजित पवार यांच्या राजकारणातील प्रवेशाच्या चर्चेने जोर धरला आहे.
जिथे भाजपच्या अस्तित्वाचा प्रश्न होता, त्या पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे सध्या चांगलेच बस्तान बसले आहे. इतके की आता भाजपचा बालेकिल्ला म्हणून या शहराकडे पाहिले जाते. ताकदीच्या राष्ट्रवादीकडून भाजपने पिंपरी महापालिका हस्तगत केली आणि हा करिश्मा बाहेरून त्यातही विशेषत: राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या नेतेमंडळींनीच करून दाखवला. सध्या त्यांच्याकडेच पक्षाची पूर्ण धुरा आहे. पक्षात नव्या मंडळींचा वरचष्मा निर्माण झाला. तसतसे, जुने अस्वस्थ झाले आणि त्यातूनच नवीन-जुना संघर्ष सुरू झाला. २०१७ च्या महापालिका निवडणुकांवेळी हा वाद चांगलाच पेटला होता. पक्षातील काही मंडळींनी स्वत:च्या फायद्यासाठी हा वाद धुमसत ठेवला. पुढे, तो वाद मिटवण्यासाठी पक्षश्रेष्ठींना बराच काथ्याकूट करावा लागला, ही घटना अगदी ताजी आहे.
आता पुन्हा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर नव्या-जुन्यांचा तोच राग आळवला जाऊ लागला आहे. पक्षाच्या मुख्य प्रवाहापासून दूर गेलेल्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आपल्यावर अन्याय होत असल्याचा कळीचा मुद्दा जाणीवपूर्वक ऐरणीवर आणला आहे. पूर्वी सदाशिव खाडे यांच्या पुढाकाराने असाच प्रयोग झाला होता आणि त्याचे फलित म्हणून खाडे पिंपरी प्राधिकरणाचे अध्यक्ष झाले होते. त्यानंतर, मात्र जुन्यांचे दुकान खाडे यांनी तत्काळ बंद केले होते. त्यावरून जुन्या मंडळींमध्ये असलेली नाराजी कायम आहे. सध्या शहरात भाजपचा कारभार आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्या हातात आहे. ते दोघेही राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले आहेत. त्यांच्यासमवेत मोठय़ा संख्येने नगरसेवक, कार्यकर्तेही भाजपमध्ये दाखल झाले होते. तेव्हापासून भाजपचे जुने कार्यकर्ते झाकोळून गेले, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, जुन्यांना काहीच मिळाले नाही, असे काही नाही. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अमर साबळे यांना राज्यसभेची खासदारकी मिळाली. त्यांचे समर्थक माउली थोरात स्वीकृत नगरसेवक झाले. एकनाथ पवार पक्षनेते झाले. मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने का होईना मोरेश्वर शेडगे यांनाही न्याय मिळाला. सदाशिव खाडे पिंपरी प्राधिकरणाचे अध्यक्ष झाले. पक्षाच्या संघटनात्मक रचनेतही अनेक जुने कार्यकर्ते कार्यरत आहेत. अॅड. सचिन पटवर्धन यांनाही सलग दोन वेळा राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्षपद मिळाले आहे. त्यामुळे नक्की जुन्यांवर अन्याय होतो की त्याचे भांडवल केले जात आहे, या विषयी जरा साशंकताच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यापर्यंत या संघर्षांची माहिती पोहोचली आहे. तेच योग्य न्यायनिवाडा करतील, असा विश्वास दोन्हीकडील मंडळींना आहे.
युतीतील वाद आणि पार्थचा प्रवेश
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ हा ऐन वेळी मावळ लोकसभेसाठी राष्ट्र्नवादी काँग्रेसचा उमेदवार असू शकतो, अशी आतापर्यंत दबक्या आवाजात होणारी चर्चा आता जाहीरपणे होऊ लागली आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी शहरभरात लागलेल्या फलकांवर पार्थची छबी ठळकपणे झळकताना दिसते आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे यांच्या सांगवीतील रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमातही अजित पवार यांच्यासमवेत पार्थने हजेरी लावली. त्यामुळे आधीपासून होत असलेल्या पार्थच्या संभाव्य उमेदवारीच्या चर्चेला आणखी खतपाणी मिळाले आहे. शरद पवार आणि अजित पवार यांचे प्रभावक्षेत्र म्हणून पिंपरी-चिंचवडकडे पाहिले जाते. पवार दिल्लीत व्यग्र झाल्यानंतर अजित पवार यांनी शहराच्या कारभाराची सूत्रे घेतली होती. २५ वर्षांहून अधिक काळ ते शहरात कार्यरत आहेत. शहरातील छोटय़ा-मोठय़ा गोष्टींची तसेच गावोगावच्या राजकारणाची, प्रमुख कार्यकर्त्यांची इत्थंभूत माहिती अजित पवार यांना आहे. सद्य:स्थितीत, पिंपरी-चिंचवड आणि मावळ विधानसभेच्या कार्यक्षेत्रात राष्ट्रवादीची चांगली ताकद आहे. शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादीत निवडणूकपूर्व आघाडी होत आहे. त्याचा फायदा मावळ लोकसभेच्या िरगणात राष्ट्रवादीला नक्कीच होऊ शकतो. भाजप आणि शिवसेना यांची युती होवो अथवा न होवो, दोन्ही पक्षांतील प्रमुख नेत्यांमधून विस्तव जात नाही. त्यांच्यातील कडवट संघर्षांचा राजकीय लाभ घेण्याची राष्ट्रवादीची व्यूहरचना आहे. पार्थच्या संभाव्य उमेदवारीची चर्चा घडवून आणत एकप्रकारे चाचपणी करून पाहणे, हा पवारांच्या खेळीचाच भाग आहे. राष्ट्रवादीला एकेक खासदार महत्त्वाचा आहे. त्यामुळे हक्काच्या मावळमध्ये ते प्रयोग करणार नाहीत, असे होणार नाही. मावळच्या आखाडय़ाचे चित्र पूर्णपणे स्पष्ट झाल्यानंतर पवारांकडून कोणती खेळी केली जाईल, या विषयी सर्वानाच उत्सुकता आहे.