भोसरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे. तुतारीचे काम आम्ही करणार नाही, असा ठराव शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. तशी कबुली शहराध्यक्ष सचिन भोसले आणि माजी विरोधी पक्षनेत्या सुलभा उबाळे यांनी दिली आहे. त्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. त्यामुळे त्यांच्या भावनांशी आम्ही देखील सहमत असल्याचं दोन्ही नेत्यांनी म्हटले आहे.

भोसरी विधानसभेमध्ये महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. शरद पवार गटाकडून अजित गव्हाणे हे उमेदवारीसाठी आग्रही आहेत. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाच्या माजी विरोधी पक्षनेत्या सुलभा उबाळे आणि रवी लांडगेदेखील आग्रही आहेत. पैकी, रवी लांडगे सध्या अ‍ॅक्टिव्ह दिसत नाहीत. भोसरी विधानसभेत शरद पवार गटाला मतदारसंघ सुटल्याची अफवा पसरवली गेली होती. यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन तुतारीचं काम न करण्याचा ठराव केल्याचं सुलभा उबाळे यांनी सांगितलं. त्यामुळे आम्ही देखील त्यांच्या मताशी सहमत असणं साहजिकच आहे. शहराध्यक्ष सचिन भोसले यांनी देखील महाविकास आघाडी म्हणून आम्ही पक्षश्रेष्ठी सांगेल त्या उमेदवाराचे काम करणार असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा – राष्ट्रवादीचा पिंपरीसह चिंचवड, भोसरीवर दावा; थेट…

हेही वाचा – ‘सीटीईटी’ लांबणीवर.. आता कधी होणार परीक्षा?

सध्या तरी सचिन भोसले यांनी चिंचवड, भोसरी आणि पिंपरीवर दावा केला आहे. ते स्वतः पिंपरी विधानसभेसाठी इच्छुक आहेत. तशी त्यांनी तयारी सुरू केलेली आहे. महाविकास आघाडीत बिघाडी झाली नसल्याचं त्यांना अधोरेखित करावे लागलं. विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. अशा राजकारणामुळे महाविकास आघाडीतील उमेदवाराला फटका बसू शकतो, यातून अंतर्गत गटबाजी देखील उफाळू शकते. अखेर पक्ष श्रेष्ठी यावर काय निर्णय घेतात? हे पाहावं लागेल. महाविकास आघाडीतून भोसरी विधानसभेसाठी कोणाला उमेदवारी मिळणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.