पिंपरी-चिंचवड शहरातील बिर्ला रुग्णालयातील ११० कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनाने ‘अल्टिमेटम’ दिला असून व्यवस्थापनाच्या या निर्णयाविरोधात कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. रुग्णालयाच्या या निर्णयाच्या निषेधार्थ आणि पगारवाढीसह इतर महत्त्वाच्या मागण्यांसाठी बिर्ला रुग्णालयातील ३५० कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरामधील बिर्ला रुग्णालयातील तब्बल ३५० कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन केले. रुग्णालय व्यवस्थापनाने तडकाफडकी निर्णय घेत ११० कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम दिला आहे. याविरोधात आज सकाळपासून बिर्ला रुग्णालयाच्या आवारात कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

गेल्या आठ वर्षांपासून पगारवाढ झाली नाही. रुग्णालय व्यवस्थापनाकडून कामगारांची पिळवणूक केली जात आहे, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. रुग्णालयात नऊ तासांची कामाची वेळ आहे. ती आठ तास करण्यात यावी. अधिक काम केले असता त्याचा मोबदला दिला जावा, अशी मागणीही कर्मचाऱ्यांनी केली. कँटीन सुविधा दिली जात नाही. ती देण्यात यावी. सध्या कर्मचाऱ्यांना ७६०० रुपये पगार दिला जात आहे. त्यात वाढ करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली. मागण्या पूर्ण न झाल्यास, तसेच ११० कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे न घेतल्यास आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आंदोलन करणारे कर्मचारी हे रुग्णालयाचे नसून, याबाबत आम्हाला कोणतीही माहिती नाही, असे बिर्ला रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा दुबे यांनी ‘लोकसत्ता ऑनलाईन’ला सांगितले.

Story img Loader