शिस्तीचा पक्ष म्हणून आपली ओळख असलेल्या भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून बेशिस्तीचे दर्शन घडताना दिसत आहे. पुणे महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांच्या निवडणुकीवेळी झालेला गोंधळ ताजा असतानाच आता पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप कार्यकर्त्यांनी तीच री ओढली आहे. स्वीकृत नगरसेवकपदी डावलल्याने नाराज इच्छुकांनी खासदार अमर साबळे आणि लोकलेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन यांच्या छायाचित्राला काळे फासले. इतक्यावरच न थांबता या कार्यकर्त्यांनी खासदार साबळे आणि पटवर्धन यांचा प्रतिकात्मक पुतळाही जाळला. या प्रकारामुळे पार्टी विथ डिफरन्स असलेल्या भाजपमधील अंतर्गत संघर्षही पाहायला मिळाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी खासदार अमर साबळे यांचे निकटवर्तीय माउली थोरात, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे मोरेश्वर शेंडगे आणि लोकलेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन यांच्या गटाचे बाबू नायर यांची वर्णी लागली होती. त्यामुळे स्वीकृत नगरसेवकांची ही निवडणूक शांततेत पार पडली असे वाटत असतानाच हा प्रकार घडला.

थोरात आणि शेंडगे यांच्या रूपानं निष्ठावानांना न्याय मिळाल्याची चर्चा ही रंगली होती. मात्र डावलण्यात आलेल्या इच्छुकांनी आज (शनिवारी) भाजपच्या पक्ष कार्यालयात एकत्र येत स्वीकृत नगरसेवक निवडीच्या विरोधात बंड करत खासदार साबळे आणि सचिन पटवर्धन यांचे प्रतिकात्मक पुतळे जाळले. तसेच नायर आणि थोरात हे या पदासाठी योग्य नसल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली. काही वेळानंतर काळे फासलेले पक्ष कार्यालयातील बॅनर हटवण्यात आले. दि. २० मेच्या सर्वसाधारण सभेत स्वीकृत नगरसेवकपदाच्या निवडणुकीची औपचारिकता पार पडेल. या प्रकारामुळे भाजपमधील बेदिली पुन्हा एकदा दिसून आली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad bjp party workers ablaze of mp amar sables symbolic image municipal election