पिंपरी : महापालिकेच्या आगामी (२०२५-२६) अर्थसंकल्पामध्ये औद्योगिक परिसरातील अंतर्गत रस्ते, वाहन तळ, ई-टॉयलेट, जलनिस्सारण वाहिनी अशा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच, पर्यावरण संस्कार उद्यानात जॉगिंग पार्क, खुली व्यायामशाळा, ध्यान केंद्र सेंटर उभारण्यासाठी विशेष तरतूद करण्यात यावी, अशी मागणी फोरम ऑफ स्मॉल स्केल
इंडस्ट्रीज असोसिएशनने महापालिकेकडे केली आहे.
असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील उद्योजकांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन दिले. आगामी अर्थसंकल्पाबाबत उद्योजकांनी आयुक्तांना अनेक सूचना केल्या. या सूचनांमध्ये औद्योगिक परिसरामध्ये मोठ्या चौकांचे विस्तारीकरण करून अंतर्गत रस्ते करावेत. सुसज्ज वाहन तळ उभारावे. युवा स्टार्टअप उद्योजक आणि उद्योजिकांसाठी कौशल्य विकास केंद्र आणि उद्योग भवन उभारावे.
टी ब्लॉक येथे पर्यावरण संस्कार उद्यानात जॉगिंग पार्क, कामगार वर्गासाठी आणि उद्योजकांसाठी खुली व्यायामशाळा, ध्यान केंद्र सेंटर तयार करण्यात यावे. उद्यानाची दुरावस्था झालेली असून त्यामध्ये सुधारणा करावी. उद्योजकांना आणि कामगारांसाठी सुसज्ज वाचनालय उपलब्ध करून द्यावे. एमआयडीसीमध्ये अंतर्गत भागात कामगारांना विशेषत: महिला वर्गाला ये-जा करण्यासाठी रिक्षा वाहतुकीची सोय करण्यात यावी. त्यासाठी महापालिकेने येणार्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद केल्यास उद्योजकांच्या समस्या सुटण्यास मोलाची मदत होईल, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. या मागण्यांबाबत आयुक्तांनी सहकार्याची भूमिका घेऊन येणार्या अर्थसंकल्पात नक्कीच विचार केला जाईल, अशी ग्वाही दिल्याचे भोर यांनी सांगितले.