स्वर्गीय भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची तारीख घोषित करण्यात आली आहे. २६ फेब्रुवारी रोजी ही निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत. भाजपानेही आज पिंपरी चिंचवडमध्ये पूर्व तयारी बैठक घेतली. या बैठकीनंतर भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपाचा उमेदवार कोण असेल? याचे संकेत दिले आहेत.

पिंपरी चिंचवडमधील नागरिक आणि भाजपा कार्यकर्त्यांच्या प्रश्नातच उत्तर दडलं आहे. येथे लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबाबद्दल कुणाचंही दुमत असण्याचं काही कारण नाही, अशा आशयाचं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपाचा उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या घरातील व्यक्ती असेल, असा तर्क लावण्यात येत आहे.

भाजपाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “आमचे नेते स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक घोषित झाली आहे.मी भाजपाच्या ‘पूर्व तयारी बैठकी’ला आलो होतो. लक्ष्मण जगताप केवळ आमदार नव्हते. ते आमचे नेते होते. महापालिका क्षेत्रात राहणाऱ्या लोकांचा ते आधार होते. २६ फेब्रुवारीला ही पोटनिवडणूक होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सगळ्यांचा प्रयत्न आहे.”

हेही वाचा- ४ दिवसांसाठी ४० कोटी: डाव्होस दौऱ्यात एकनाथ शिंदेंनी मित्रपरिवारावर पैसा उडवला? आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप

“पण भारतीय जनता पार्टी ‘पुरेसा आधी विचार करा आणि पुरेसा परिपूर्ण विचार करा’ अशा कार्यपद्धतीची आहे. त्यामुळे गाफील न राहता या निवडणुकीच्या पूर्वतयारी बैठकीला मी आलो. उमेदवार ठरवण्यासाठी ही बैठक नव्हती. उमेदवार ठरवण्यासाठी भाजपाची प्रक्रिया ठरलेली आहे. इच्छुकांची नावं प्रदेशाकडे जातात. प्रदेशाची एक कोअर कमिटी आहे. त्यानंतर ही नावं केंद्रीय संसदीय बोर्डाकडे जातात. त्यानंतर दिल्लीतून निर्णय घोषित होतो. ही उमेदवार ठरवणारी बैठक नव्हती,” अशी माहिती चंद्रकांत पाटलांनी दिली.

हेही वाचा- भाजपा-शिवसेना युती तोडायला लावणारे खरे ‘मास्टरमाइंड’ एकनाथ शिंदेच? संजय राऊतांचं सूचक विधान

भाजपाच्या संभाव्य उमेदवारावर भाष्य करताना पाटील म्हणाले, “उमेदवार कोण असावा? याचा निर्णय आमची प्रांताची कोअर कमिटी ठरवते. त्यामुळे त्यावर मी भाष्य करणं बरोबर नाही. पण पिंपरी चिंचवडमधील प्रत्येक नागरिकाच्या आणि भाजपाच्या कार्यकर्त्याच्या प्रश्नामध्येच उत्तर दडलं आहे. भाऊंच्या (लक्ष्मण जगताप) कुटुंबाबद्दल कुणाचंही दुमत असण्याचं काहीही कारण नाही. पण याचा अंतिम निर्णय प्रदेशाची कोअर कमिटी घेईल.”

Story img Loader