पिंपरी-चिंचवडच्या दहशतवाद विरोधी शाखेने बनावट पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट बनवणाऱ्या दोन एजेंटवर गुन्हा दाखल केला आहे. बाराशे ते दीड हजार रुपयांपर्यंत बनावट पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट दिले जात असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी संदीप बनसोडे आणि सुनील रोकडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
आत्तापर्यंत ड्रायव्हर, सिक्युरिटी गार्ड, हाऊस कीपिंग स्टाफ यांना बनावट कागदपत्रांच्या आधारे पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट मिळवून दिल्याचे समोर आलेले आहे. अनेक बनावट पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट हे पुण्यातील चतुर्शिंगी आणि येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याचे देखील पोलिसांनी सांगितले आहे. तर काही ठिकाणी बनावट पोलीस ठाण्याचे नाव देऊन हे सर्टिफिकेट बनवण्यात आले आहेत.
हेही वाचा – पुणे : दरडप्रवण गावातील कामांना गती, २०० कोटींचा निधी मंजूर
एका नामांकित कंपनीत संवेदनशील ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तींचे देखील बनावट पोलीस व्हेरिफिकेशन असल्याचे समोर आल आहे. आतापर्यंत पोलिसांकडे सादर करण्यात आलेले ४१ पोलीस व्हेरिफिकेशन हे बनावट आणि खोट्या कागदपत्राद्वारे बनवले असल्याचं उघड झाले आहे. दिघी आळंदी आणि चऱ्होली या परिसरात या एजेंटचा सुळसुळाट असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.