खुद्द महापौरांचाच प्रभाग म्हटल्यानंतर तेथील नागरी सुविधांचे एक चांगले चित्र सामान्य नागरिकांच्या डोळ्यासमोर येत असते. बहुतांश महापालिकांत अशीच स्थिती असते. पण याला पिंपरी चिंचवड महापालिका अपवाद असल्याचे दिसून येते. महापौर नितीन काळजे यांच्या चऱ्होली गावातील नागरिकांच्या हाती मात्र निराशा आली आहे. या प्रभागात पालिकेचे रूग्णालय आहे. पण वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांअभावी येथील नागरिकांना आरोग्य सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे. नेमणूक करूनही वैद्यकीय अधिकारी रूग्णालयात रूजू न झाल्याने नागरिकांच्या आरोग्याची हेळसांड होत आहे. रूग्णालयाची अवस्थाही बिकट झाली आहे. अस्ताव्यस्तपणे पसरलेला कचरा, धुळ खात पडलेली औषधे, त्यामुळे हे रूग्णालयच ‘व्हेटिंलेटर’वर असल्याचे दिसत आहे.
पिंपरी चिंचवड महापलिकेत प्रथमच भाजपला सत्ता मिळाली. त्यांनीही पालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या चऱ्होली गावातील नितीन काळजे यांना महापौर पदाची संधी दिली. त्यामुळे आपल्या प्रभागात आता विकासाची गंगा येणार या आशेवर असणाऱ्या नागरिकांना मात्र आता निराशेला सामोरे जावे लागत आहे. गावात पालिकेचे एक रूग्णालय आहे. गेल्या काही दिवसांपासून इथे वैद्यकीय अधिकारी गैरहजेर आहेत. त्यामुळे दररोज रूग्ण येतात. पण वैद्यकीय अधिकारीच नसल्यामुळे त्यांना उपचाराविना परत जावे लागत आहे. ही समस्या कायम असतानाच आता परिचारिकाही गैरहजर असल्यामुळे रूग्णांच्या अडचणीत भरच पडली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा