पिंपरी : चिखली, कुदळवाडी, जाधववाडी परिसरातील अनधिकृत बांधकाम आणि पत्राशेडवर महापालिकेने कारवाई केल्याने प्रस्तावित प्रकल्प विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या भागातील आरक्षणे ताब्यात घेण्याची प्रक्रिया महापालिका राबविणार आहे. प्रस्तावित प्रकल्प विकसित झाल्यानंतर या भागातील रहिवाशांना नागरी सुविधा मिळणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चिखली, कुदळवाडी, जाधववाडी भागाचा पायाभूत विकास साधण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने सन १९९६-९७ च्या विकास आराखड्यामध्ये आरक्षणे निश्चित केली आहेत. परंतु, या भागात वाढत गेलेली अनधिकृत बांधकामे आणि पत्राशेड यामुळे आरक्षित जागा ताब्यात घेण्यास अडचणी आल्या. राजकीय दबाव आणि स्थानिकांचा विरोध झाल्याने आरक्षण विकसित करण्यात अडथळे आले. अनधिकृत बांधकामे व पत्राशेड धारकांना महापालिकेने अनेकवेळा नोटिसा दिल्या. तरीही, अनधिकृत बांधकामे काढली जात नव्हती.

महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मुलन विभागाने चिखली, कुदळवाडी, जाधववाडी येथील ९३२ एकरवरील चार हजार ७९६ अनधिकृत बांधकामे व पत्राशेड कारवाई करून हटवली. त्यामुळे सन १९९६-९७ च्या महापालिका विकास आराखड्यातील पाण्याची टाकी, प्राथमिक शाळा, टाऊन हॉल, वाहनतळ यासह रस्त्याची आरक्षित जागा ताब्यात घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आरक्षित जागा ताब्यात आल्यानंतर विकास प्रकल्प राबविण्यास गती देण्यात येणार आहे. तसेच १२, १८, २४ आणि ३० मीटरचे नियोजित रस्ते विकसित करण्यात येणार आहे.

याबाबत नगररचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड म्हणाले, ‘चिखली-कुदळवाडी-जाधववाडी भागातील आरक्षित जागा ताब्यात घेण्यासाठी सर्वेक्षण केले जाईल. जागा मालकांना हस्तांतरित विकास हक्क (टीडीआर) आणि चटई क्षेत्र निर्देशांकाचा (एफएसआय) मोबदला देऊन जागेचा आगाऊ ताबा घेण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात शिबिर लावून, ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे’.