पिंपरी : उन्हाचा तडाखा वाढल्याने बाष्पीभवनामुळे शहरवासीयांची तहान भागविणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठ्यात घट होऊ लागली आहे. आजमितीला धरणात ४४.७२ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. उपलब्ध पाणीसाठा जूनअखेरपर्यंत पुरेल असा पाटबंधारे विभागाचा अंदाज आहे. मात्र, पावसाळा लांबल्यास मागील साडेचार वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जात असलेल्या नागरिकांना आणखी पाणीटंचाईस सामोरे जावे लागेल, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरासाठी महापालिका पवना धरणातून दररोज ५१० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी घेते. हे पाणी पवना नदीवरील रावेत बंधारा येथून अशुद्ध जलउपसा केंद्रात उचलले जाते. निगडीतील पेठ क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध करून शहरात पुरविले जाते. गेल्या काही दिवसापांसून आंद्रातून होणारा अपुरा पाणीपुरवठा आता सुरळीत झाला असून, महापालिका ८० एमएलडी पाणी इंद्रायणी नदीवरील निघोजे येथील बंधाऱ्यातून उचलते. या पाण्यावर चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून चिखली, मोशी, चऱ्होली, भोसरी परिसरात पाणीपुरवठा केला जात आहे.
हेही वाचा…शाब्बास! महिलेच्या प्रसंगावधानामुळे तरुणीवरील हल्ल्याचा प्रयत्न फसला…
तर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून महापालिका २० एमएलडी पाणी घेते असे एकूण ६१० एमएलडी पाणी शहराला एका दिवसाला दिले जात आहे. एप्रिल महिना सुरू झाला असून, उन्हाळा तीव्र होत चालला आहे. उन्हाचा पारा चाळिशीपार होऊ लागला आहे. उन्हाच्या झळा आणखी वाढण्याची शक्यता आहे. बाष्पीभवनामुळे पवना धरणातील पाणीसाठा कमी होत आहे. धरणात आजमितीला ४४.७२ टक्के पाणीसाठा आहे. वाढत्या उन्हाबरोबरच पाण्याची मागणी वाढली आहे. पाण्याची वाढती मागणी, बाष्पीभवन यामुळे धरणातील पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.
गेल्या वर्षीपेक्षा कमी पाणी
शहराला मुख्यतः मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. पवना धरणात आजमितीला ४४.७२ टक्के पाणीसाठा आहे. हा साठा जूनअखेरपर्यंत पुरेल एवढा आहे. गतवर्षी ४६.३७ टक्के साठा होता. गतवर्षीपेक्षा १.६५ टक्क्याने कमी असून, पाण्याची मागणी वाढली आहे.
हेही वाचा…पुणे : नाव गोपनीय ठेवून करता येणार तक्रार
पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाईस टाळाटाळ
पिण्याच्या पाण्याने वाहने, रस्ते, घर, गृहनिर्माण संस्था परिसर धुताना आढळल्यास प्रथम नोटीस बजावण्यात येईल. दुसऱ्यांदा पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करताना आढळल्यास नळजोड तोडण्यात येईल, असा इशारा महापालिकेने दिला होता. त्यानंतरही पिण्याच्या पाण्याने वाहने, अंगण, रस्ते धुण्याचे प्रकार सुरू असून, पाण्याची नासाडी केली जात आहे. मात्र, पाणीपुरवठा विभागाकडून कारवाई केली जात नसल्याचे चित्र आहे. मनुष्यबळ कमी असल्याने कारवाई करता येत नसल्याचे अधिकारी सांगत आहेत.
हेही वाचा…पुन्हा विद्यार्थी भिडले! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात पुन्हा हाणामारी….
ऊन वाढत आहे. ऊन वाढल्याने बाष्पीभवनामुळे धरणातील पाणी कमी होत आहे. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पवना धरणाचे शाखा अभियंता रजनीश बारिया यांनी केले.