पिंपरी: भामा आसखेड आणि आंद्रा धरणातील मंजूर पाणी आणण्यासाठी टाकण्यात येणाऱ्या जलवाहिनीच्या कामाला गती देण्यात आली आहे. जलवाहिनी, जलशुद्धीकरण केंद्राचे काम एकाच वेळी पूर्ण करण्यावर भर आहे. सन २०२५ पर्यंत कामे पूर्ण होतील, असे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले. त्यामुळे मागील साडेतीन वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जात असलेल्या शहरवासीयांना २०२५ नंतरच दररोज पाणी मिळण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहराचा लोकसंख्यावाढीचा वेग आणि भविष्यातील सन २०४५ पर्यंतची लोकसंख्या विचारात घेऊन महापालिका आंद्रा व भामा आसखेड धरणातून २६७ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी आणणार आहे. त्या पाण्यावरील प्रक्रियेसाठी महापालिकेच्या वतीने चिखलीत आठ हेक्टर परिसरात जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. आंद्रा धरणातून निघोजे येथील बंधाऱ्यातून पाणी उचलून समाविष्ट भागातील नागरिकांना देण्यात येत आहे. परंतु, वाढत्या लोकसंख्येला पाणी कमी पडत असून, तक्रारींमध्ये वाढ होत आहे.

हेही वाचा… पीएमपीच्या कर्मचाऱ्यांचीही दिवाळी गोड

भामा आसखेड धरणातून पाणी आणण्यासाठीच्या जलवाहिनीचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय), वन, जलसंपदा विभागाच्या जागेतून होत आहे. त्यामुळे जागेचे संपादन करण्यात अडचणी येत आहेत. त्यातून मार्ग काढून कामाला गती दिली आहे. महापालिका हद्दीतील आठ किलोमीटर जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. दर महिन्याला कामाचा आढावा घेतला जात आहे. २०२५ पर्यंत काम पूर्ण होईल, असे आयुक्त सिंह यांनी सांगितले.

दिवसाला ५९३ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा

शहरवासीयांना पवना आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. महापालिका दिवसाला पवना धरणातून ५१०, चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रातून ७० आणि औद्योगिक विकास महामंडळाकडून १३ असे ५९३ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी उचलते.

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पावरील स्थगिती शासनाने उठविली आहे. काम सुरू करण्याबाबत जुन्या ठेकेदारासोबत चर्चा सुरू आहे. नव्याने आराखडा करायचा, की पूर्वीप्रमाणेच काम सुरू करायचे याबाबत अंतिम निर्णय झाला नाही. तांत्रिक बाबी तपासून निर्णय घेणार आहे. – शेखर सिंह, आयुक्त

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad citizens will get daily water only after 2025 due to the pending work of water channel and water treatment plant pune print news ggy 03 dvr