पिंपरी : स्वच्छतेसाठी भरीव कामगिरी करणारी देशातील अनेक शहरे पुढे आली आहेत. मात्र, एकेकाळी ‘बेस्ट सिटी’ म्हणून देशभरात नावलौकिक मिळवलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची पिछेहाट झाली आहे, हे पिंपरी पालिकेचे अपयश आहे. त्यासाठी पालिकेने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शनिवारी पिंपरीत केली. शहरातील सोसायटीधारकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी अजित पवार यांनी पालिका मुख्यालयात बैठक घेतली. आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर संजोग वाघेरे, मंगला कदम, योगेश बहल आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले की, देशभरातून ‘सुंदर शहर’ म्हणून कौतुक झालेल्या पिंपरी-चिंचवडचा यंदा १९ वा क्रमांक लागला, याचा अर्थ अनेक पातळीवर महापालिका अयशस्वी ठरली आहे. नागरिकांना, अभ्यासकांना या मोहिमेत सहभागी करून घेण्यात पालिका कमी पडली. यापूर्वी या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप होते. आता तसे दिसून येत नसल्याने नामांकन खालावले असावे.

हेही वाचा : राज्यात मध्यावधी निवडणुका होणार नाहीत ; अजित पवार यांचे वक्तव्य

शहरात गेल्या काही वर्षांत सोसायट्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. त्याच प्रमाणात सोसायटीधारकांच्या समस्याही वाढल्या आहेत. बांधकाम व्यावसायिक, रेरा कायदा, महापालिका, पीएमआरडीए आदींशी संबंधित असणाऱ्या प्रश्नांवर बैठकीत चर्चा झाली. आयुक्तांना योग्य ती कार्यवाही करण्याची; तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आवश्यक पाठपुरावा करण्याची सूचना पवार यांनी केली. राज्य शासनाशी संबंधित प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन पवार यांनी दिले.

Story img Loader