पुणे : पुण्यापेक्षा पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील वार्षिक बाजारमूल्य दरामध्ये (रेडिरेकनर) वाढ झाली आहे. पुण्यात सरासरी ४.१६ टक्के, तर पिंपरी-चिंचवडमध्ये ६.६९ टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यापेक्षा पिंपरी-चिंंचवड महापालिका क्षेत्रातील घरांचे आणि जमिनींचे दर चढे राहणार आहेत.
राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून सोमवारी रेडिरेकनरमध्ये दरवाढ करण्यात आली. आजपासून (१ एप्रिल) ही दरवाढ लागू होणार आहे. करोना संकटामुळे एक एप्रिल २०२० ऐवजी सप्टेंबर २०२० मध्ये रेडिरेकनरच्या दरात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर २०२१-२२ मध्ये कोणतीही दरवाढ करण्यात आली नव्हती. त्यानंतर २०२२-२३ या आर्थिक वर्षात रेडिरेकनरच्या दरात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन रेडिरेकनरचे दर ‘जैसे थे’ ठेवण्यात आले होते. मात्र, आगामी आर्थिक वर्षासाठी एक एप्रिलपासून रेडिरेकनरच्या दरात वाढ होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती.
पुण्यात सरासरी ४.१६ टक्के वाढ करण्यात आली आहे. रेडिरेकनरच्या दरात वाढ झाल्याने शहरातील घरांच्या किमतीही वाढणार आहेत. कोरेगाव पार्क, प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, बोट क्लब, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता परिसरातील घरांना जास्त मागणी असते. त्यामुळे या भागातील रेडिरेकनरच्या दरातही वाढ होणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात ६.६९ टक्के वाढ करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांत पिंपरी-चिंचवडचा झपाट्याने विकास होत आहे. या महापालिका हद्दीत असलेल्या औद्योगिक कंपन्या, माहिती आणि तंत्रज्ञान कंपन्यांचे जाळे यामुळे या भागातील सदनिकांची मागणी वाढली आहे. त्याचा परिणामही पिंपरी-चिंचवडमधील रेडिरेकनरच्या दरावर दिसून आला आहे. त्यामुळे पुण्याच्या तुलनेत पिंपरी-चिंचवड शहरात रेडिरेकनरच्या दरात वाढ झाली आहे.