लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : ‘दुर्गा टेकडीचा पुनर्विकास करताना निसर्गाचे संवर्धन करण्यास महत्त्व दिले जाणार आहे. या विकास कामाच्या अनुषंगाने नागरिकांना सूचना देता याव्यात, दुर्गा टेकडीच्या विकासात नागरिकांना अपेक्षित असणाऱ्या गोष्टींवर सविस्तर चर्चा व्हावी, यासाठी आयोजित दुर्गा टेकडी उद्यान डिझाईन विचारसरणी कार्यशाळेत आलेल्या नागरिकांच्या सूचनांचा विचार करून दुर्गा टेकडीचा पुनर्विकास करण्याची’ ग्वाही महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. पिंपरी-चिंचवड शहर वनीकरण (अर्बन फॉरेस्ट) बनविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

‘अ’ प्रभागातील निगडीतील दुर्गा टेकडीचा पुनर्विकास करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. या अनुषंगाने नागरिकांशी चर्चा करण्यासाठी दुर्गा टेकडी येथे ‘दुर्गा टेकडी उद्यान डिझाईन’ विचारसरणी कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली होती. यावेळी आयुक्त सिंह बोलत होते. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे- पाटील, कार्यकारी अभियंता विजय भोजने, सहायक आयुक्त उमेश ढाकणे, उप अभियंता निखिल फेंडर, कनिष्ठ अभियंता संदीप ठोकळे, अनिल झोडे, उद्यान निरीक्षक अशोक वायकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

‘दुर्गा टेकडीचा पुनर्विकास करण्याचे नियोजित आहे. त्यासाठी सर्वांसोबत चर्चा केली जात आहे. कार्यशाळेत आलेल्या सूचनांचा विचार केला जाईल. येथील निसर्ग जपत विकास करण्यास प्राधान्य दिले जाईल. पिंपरी-चिंचवड शहर वनीकरण (अर्बन फॉरेस्ट) बनवण्याचा उपक्रम महापालिकेने हाती घेतला आहे. नुकतेच तळवडे येथे उद्यान उभारले आहे. शहरात आणखी तीन ठिकाणी मोठे वन उद्यान बनवण्याचे नियोजन आहे,’ असल्याचे आयुक्त सिंह यांनी सांगितले.

कार्यशाळेत सहभागी झालेल्या नागरिकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना आयुक्तांनी सविस्तर उत्तरे दिली. या चर्चेमध्ये वास्तूविशारद राहुल कादरी, वाईड अँगल फोरमच्या प्रिया गोखले, पर्यावरण शिक्षण विभागाच्या संस्कृती मेनन, सतीश आवटे, वीर मास्टर यांच्यासह विविध स्वयंसेवी संस्था व संघटनांचे प्रतिनिधी, पर्यावरण प्रेमी नागरिक आदींनी सहभाग घेतला. कार्यशाळेनंतर दुर्गा टेकडी येथील वाहनतळ, डॉल्फिन पार्कची पाहणी सिंह यांनी केली.

पिंपरी-चिंचवड शहरात ३२ लाख वृक्ष

शहरात लागवड करण्यात आलेल्या वृक्षांची माहिती मिळावी यासाठी भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे (जीआयएस टॅगिंग) करून वृक्षांची गणना करण्यात आली आहे. या गणनेत शहरात ३२ लाख १६ हजार ७९९ वृक्ष असल्याचे दिसून आल्याचा दावा महापालिकेने केला आहे.