पिंपरी-चिंचवडमध्ये ओमायक्रोनचे ६ रुग्ण आढळल्यानंतर आयुक्त राजेश पाटील यांनी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन केलं आहे. नायजेरियातून आलेल्या महिलेच्या संपर्कातील सर्व व्यक्तींची टेस्ट करण्यात आली आहे. इतरांना संसर्ग होईल अशी शक्यता नसल्याचंही त्यांनी नमूद केलं. तसेच पिंपरी चिंचवडमध्ये ६ ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झालेले रूग्ण आढळल्याने निर्बंध लावणार का या प्रश्नाचंही पाटील यांनी उत्तर दिलं. “पुढे जशी परिस्थिती ओढावेल तसे निर्णय घेतले जातील. आत्ताच्या परिस्थितीवर नागरिकांना पॅनिक करणे योग्य नाही,” असं मत त्यांनी व्यक्त केलं. ते लोकसत्ताशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयुक्त राजेश पाटील म्हणाले, “नागरिकांनी घाबरून जाऊ नये, नायजेरियातून एकच महिला आली होती. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची टेस्ट करण्यात आली आहे. या केसमध्ये इतरांना संसर्ग झाला असेल असं प्रथमदर्शी वाटत नाही. यापुढे प्रत्येकाने काळजी घेणे, मास्क वापरणे, गर्दी टाळणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे ज्यांनी लसीकरण केले नाही त्यांनी लसीकरण करून घ्यावे.”

सहा रुग्णांवर कुठे उपचार सुरू आहेत?

पिंपरी-चिंचवड शहरातील एकाच कुटुंबातील ६ जणांना ओमायक्रोनची बाधा झाली. ४४ वर्षीय महिला नायजेरियातून दोन्ही मुलींसह पिंपरीत तिच्या भावाकडे आली होती. तेव्हा तिच्यासह भाऊ आणि त्यांच्या दोन मुली अशा एकूण ६ जणांना ओमायक्रोनची बाधा झाली आहे. या ६ जणांना पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या नवीन जिजामाता रुग्णालयात विलीगकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा : चिंता वाढली! पिंपरी-चिंचवडमध्ये सहा, पुण्यात एक पॉझिटिव्ह रूग्ण आढळला!

समाधानाची बाब म्हणजे यातील ४४ वर्षीय महिलेला ताप आलेला असला तरी इतर मुलांना आणि महिलेच्या भावाला जास्त लक्षणं नाहीत. ते सर्व सुखरूप आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली आहे. 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad commissioner comment on restriction after 6 omicron patient found pbs