पिंपरी-चिंचवडमधून पलायन करणाऱ्या करोनाग्रस्त रुग्णाला सहा तासांनी पुन्हा नाट्यमयरित्या पकडण्यात भोसरी पोलिसांना आणि डॉक्टरांना यश आले आहे. शनिवारी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओही समोर आलाय. दरम्यान, करोनाग्रस्त रुग्णाला पुन्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थायलंड येथून आलेल्या एका व्यक्तीला भोसरी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यानंतर शनिवारी रात्री आठच्या सुमारास त्याची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. डॉक्टर फॉर्म भरून घेत असताना संबंधित रुग्णाला आपण करोनाग्रस्त असल्याचं समजलं. त्यामुळे घाबरलेल्या त्या रुग्णाने रुग्णाने डॉक्टरांची नजर चुकवून रुग्णालयातून पलायन केले. घटनेनंतर डॉक्टर आणि संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. याची माहिती भोसरी पोलिसांनाही देण्यात आली. त्यानंतर, वरिष्ठ अधिकारी राम जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे आणि पोलीस उपनिरीक्षक नामदेव तलवाडे यांनी कर्मचाऱ्यांसह पळून गेलेल्या रुग्णाचा तपास सुरू केला.

पोलिसांच्या तपासात पळून गेलेल्या करोनग्रस्त रुग्णाने मित्रांकडून दुचाकी घेऊन शहरात फेरफटका मारल्याची माहिती मिळाली. दरम्यान, भोसरी पोलीस आणि डॉक्टरांचं पथक रुग्णाच्या घरी पोहोचले आणि रुग्णाला फोन करण्यास सांगितले व त्याला घराजवळ बोलावण्यात आले. घराजवळ येताच रुग्णाला पोलिसांनी घेराव घातला. पण करोनाग्रस्त असल्याने पोलिसांनी त्याला हात लावला नाही. काही क्षणांमध्येच रुग्णवाहिका आली आणि पोलिसांनी व डॉक्टरांनी त्याला रुग्णवाहिकेत बसण्यास सांगितले. थोड्या वेळात तो रुग्ण स्वतः रुग्णवाहिकेत बसला. त्यानंतर, तो रुग्ण ज्या मित्राला भेटला त्याची, आई वडिलांची आणि बहिणीची करोना टेस्ट घेण्यात आली असून ती निगेटिव्ह आली आहे. मात्र, या प्रकरणानंतर भोसरी येथील रुग्णालयात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

 

 

Story img Loader