केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेतून पिंपरी-चिंचवडला वगळण्याच्या मुद्दय़ावरून शहरातील राजकारण पेटलेले असतानाच सत्तारूढ राष्ट्रवादीने याच विषयावर सविस्तर चर्चा घडवून आणण्यासाठी सोमवारी (७ सप्टेंबर) विशेष सभेचे आयोजन केले आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपवर खापर फोडण्याची खेळी राष्ट्रवादीने या निमित्ताने खेळली आहे.
सोमवारी दुपारी दोन वाजता ही सभा होणार आहे. सभेत आवश्यक तो ठराव करून तो मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येणार असल्याचे महापौर शकुंतला धराडे यांनी पत्रकारांना सांगितले. स्थायी समितीच्या सदस्यांनी ही सभा व्हावी, यासाठी आग्रही मागणी केली आहे. सध्याचे तापलेले वातावरण पाहता सभेतील वादळी चर्चेत भाजपवर चौफेर हल्ला चढवण्याची रणनीती आहे. ‘स्मार्ट सिटी’चा मुद्दा सर्वच स्तरावर गाजतो आहे. भाजपने िपपरी पालिकेवर राजकीय भावनेतून अन्याय केला, अशीच भावना सर्वसामान्यांच्या मनात आहे. शिवसेनेने या प्रकरणातून सोयीस्करपणे अंग काढून घेतल्याने ‘भाजप विरुद्ध सगळे’ असे चित्र आहे. विशेष सभेच्या मागणीसाठी सेनेच्या नगरसेवकांचीही मागणी आहे. राष्ट्रवादीच्या पुढाकाराने स्थापन केलेल्या सर्वपक्षीय ‘स्वाभिमान’ समितीच्या माध्यमातून रान पेटवण्यास सुरुवात झाली आहे. ‘स्मार्ट सिटी’वरून तापलेल्या वातावरणाचा फायदा घेण्यासाठी तसेच कोंडीत सापडलेल्या भाजपला आणखी अडचणीत आणण्यासाठी ही विशेष सभा होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा