पिंपरी : ‘इंस्टंट पे’, ‘एअर पे’, ‘स्पाईस मनी’ या ‘फिनटेक कंपन्यां’चा वापर करून सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी ‘एअर पे’च्या कर्मचाऱ्यासह सहा जणांना अटक करण्यात आली.नरेश सुजाराम चौधरी, जिलानी जानी शेख (रा. घाटकोपर, मुंबई) अमित बट्टुलाल साहू (रा. उरण), इरफान खलील शेख, किरण वासुदेव जेठनानी, मकरंद संजीव विळेगावकर (तिघे रा. पनवेल) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने एकाची दोन लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील फसवणुकीची रक्कम हस्तांतरित झालेल्या बँक खात्याची माहिती घेतली असता ते ‘इन्फिनिटी एंटरप्रायझेस’ नावाने आहे. त्यावर मोठ्या रकमेचे व्यवहार झाल्याचे दिसले. या बँक खात्यावरून चौधरीच्या नावे असणाऱ्या खात्यावर पैसे हस्तांतरित झाल्याचे समोर आले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता संजय नावाच्या व्यक्तीने पैसे पाठवले असल्याचे त्याने सांगितले. ती रक्कम काढून रोख स्वरूपात फरारी आरोपी नाथु याला देत असल्याचे सांगितले. चौधरीने जिलानी शेखकडून ८० लाख रुपये घेऊन नाथूच्या ‘एअर पे’च्या खात्यावर घेतले. साहू हा पैसे पाठविण्याचे काम करतो. त्याच्या खात्यावर नाथूकडून मोठी रक्कम आल्याचे दिसून आले. पैशांची अफरातफर झाल्याचे दिसल्याने पोलिसांनी अधिक तपास केला.
‘म्यूल’ खात्यामार्फत फसवणूक
आरोपी मास्टर डिस्ट्रीब्युटर, डिस्ट्रीब्युटर, रिटेलर अशी खाती तयार करत असे. वेगवेगळ्या सायबर गुन्ह्यांतील रक्कम ही ‘म्यूल’ खात्यामार्फत ‘इन्फिनिटी एंटरप्रायझेस’ खात्यावर घेत होते. त्यावरून ‘फिनटेक कंपनी’च्या खात्यावर रक्कम जमा करत असे. सीएमएस इन्फोटेक कंपनीकडे जमा होणारी रोख रक्कम नाथू हा आंगडियामार्फत पाठवून सायबर फसवणूक करीत असल्याचे उघडकीस आले.