पिंपरी : महापालिकेच्या अग्निशामक विभागासाठी अग्निशामक विमोचक (फायरमन रेस्क्युअर) या पदाच्या १५० जागांसाठी घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेला सात, तर मैदानी परीक्षेला दाेन महिने हाेऊन गेल्यानंतरही फायरमनची भरती रखडली आहे. निवड समितीच्या बैठकीला अद्याप मुहूर्त मिळत नसल्यामुळे या पदाच्या अंतिम यादीला विलंब झाल्याचे निदर्शनास आले आहे.
पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात मागील काही वर्षांपासून आगीच्या घटना सातत्याने घडत आहेत. तत्काळ आग विझविण्यासाठी महापालिकेच्या अग्निशामक दलाचे जवान तत्पर असतात. मात्र, शहरात वाढणाऱ्या मालमत्ता आणि लाेकसंख्येमुळे सद्य:स्थितीत अग्निशामक दलाकडे असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडत आहे. याचा विचार करून महापालिका प्रशासनाने गेल्या वर्षी अग्निशामक दलासाठी १५० फायरमनची भरती प्रक्रिया राबविण्यात आली.
फायरमनच्या १५० जागांसाठी एक हजार ५०० अर्ज आले. या परीक्षार्थींची २९ ऑगस्ट २०२४ रोजी ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत ८९५ उमेदवार उत्तीर्ण झाले. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने चाचणी घेण्यास नकार दिल्याने ही परीक्षा रखडली होती. त्यानंतर २२ ते २४ जानेवारी २०२५ या कालावधीत भोसरी येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलात शंभर गुणांची शारीरिक क्षमता मैदानी चाचणी घेण्यात आली.
शारीरिक क्षमता आणि मैदानी चाचणीस ८९५ पैकी ६४३ उमेदवारांनी हजेरी लावली. त्यातील पाच उमेदवार अपात्र ठरले. २५२ उमेदवार गैरहजर राहिले हाेते. त्यामुळे १५० जागांसाठी ६४३ उमेदवार पात्र ठरले आहेत. या पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी सामान्य प्रशासन विभागाकडून करण्यात आली. त्यानंतर १५ दिवसांत अंतिम यादी जाहीर केली जाणार होती. मात्र, यादी प्रसिद्ध हाेण्यापूर्वी आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची बैठक हाेणे गरजेचे आहे. या बैठकीसाठी तीन वेळा तारीख निश्चित हाेऊनही बैठक झाली नाही. त्यामुळेच फायरमनची भरती रखडल्याचे निदर्शनास आले आहे.
फायरमन भरतीसाठीसंदर्भात निवड समितीची लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. बैठक झाल्यानंतर चार दिवसांत पात्र उमेदवारांची अंतिम यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर पात्र उमेदवारांना अग्निशामक दलात रुजू करून घेतले जाईल, असे सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जाेशी यांनी सांगितले.