मोठा गाजावाजा करुन पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोशी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रदर्शन केंद्र उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या तीन-चार वर्षांत अनेक घडामोडी होऊनही आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राचे काम काही सुरू होऊ शकलेले नाही. शेवटी या प्रदर्शन केंद्राचा निर्णय गुंडाळण्याची नामुष्की पिंपरी प्राधिकरणावर आली आहे. आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र गुंडाळून आता त्यासाठी आरक्षित असलेल्या अडीचशे एकर जागेपैकी ४० हेक्टर जागेचे सपाटीकरण केले जाणार आहे.
उद्योगनगरी म्हणून ओळखले जात असलेले पिंपरी चिंचवड शहर ऑटोमोबाईल हब म्हणूनही जगभरात नावारुपास आले आहे. त्यामुळे औद्योगिक कंपन्यांसाठी पूरक असणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रदर्शन केंद्र उभारण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला होता. त्यासाठी स्वतंत्र कंपनी (स्पेशल पर्पज व्हेईकल- एसपीव्ही) देखील स्थापन केली जाणार होती. त्या कंपनीमार्फत हे प्रदर्शन केंद्र उभारण्यात येणार होते. अत्याधुनिक आणि सर्व सोयींनी युक्त अशा प्रदर्शन केंद्राचे संकल्प चित्र तयार करण्यासाठी एसजीएस या कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती. त्यासाठी प्राधिकरणाने कंपनीला काही रक्कमही अदा केली होती. त्यानंतर राज्य शासनाने प्रदर्शन केंद्राचा खर्च प्राधिकरणाने करावा असे सांगितले. तेव्हापासून प्रदर्शन केंद्राच्या निर्मितीचे काम थंडावले. पर्यावरण ना हरकत दाखला मिळवण्यासाठी प्राधिकरणाला झगडावे लागले आहे. अजूनही तो दाखला प्राधिकरणाला मिळालेला नाही.
आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र तयार करण्यासाठी प्राधिकरणाकडे पुरेसा निधी नसल्यामुळे त्याचा गाशा गुंडाळण्यात आला. दरम्यानच्या काळात सप्टेंबर २०१५ मध्ये संकल्प चित्र तयार केलेल्या एसजीएस या कंपनीने प्राधिकरणाच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या प्रदर्शन केंद्रासाठीच्या आरक्षित जागेत प्राधिकरणाला खुले प्रदर्शन केंद्रही तयार करता आले नाही. त्याच जागेवर ४० हेक्टर जागेला तारेचे कुंपण घालून जागा सपाट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यावरण विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र प्राधिकरणाला मिळवता आलेले नाही. छोटे प्रदर्शन केंद्र तयार होण्यासाठी उद्योजकांना तसेच नागरिकांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे. आघाडी सरकारकडून आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रासाठी म्हणावे तसे सहकार्य मिळाले नाही. ते सरकार पायउतार झाल्यानंतर भाजप सरकारलाही प्रदर्शन केंद्रामध्ये स्वारस्य नसल्याचे चित्र आहे.