विधानसभा निवडणुका जवळ येऊ लागल्या, तसे राजकीय वातावरण तापू लागले आहे. निवडणुकांमध्ये शहराध्यक्ष ‘सेनापती’च्या भूमिकेत असताना सेनापतींच्याच विरोधात सैन्य, असे राजकारण दिसून येत आहे. आपल्या पक्षाचा झेंडा फडकवण्याची व्यूहरचना एकीकडे होत असताना प्रतिस्पध्र्यापेक्षा स्वपक्षातील ‘दुखणे’ हेच शहराध्यक्षांना मोठे आव्हान असल्याची परिस्थिती आहे.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल, काँग्रेसचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर, भाजपचे शहराध्यक्ष सदाशिव खाडे, मनसेचे शहरप्रमुख मनोज साळुंके यांच्यासमोर पक्षांतर्गत पातळीवर वेगवेगळी आव्हाने आहेत, शिवसेनेतही फारसे वेगळे चित्र नाही. शहरप्रमुखपद बरखास्त करून राहुल कलाटे (चिंचवड), विजय फुगे (भोसरी), योगेश बाबर (पिंपरी) हे तीन विधानसभानिहाय शहरप्रमुख नेमण्यात आले, त्यातील कलाटे चिंचवडसाठी तर फुगे भोसरीसाठी तयारीत असून दोघांचेही भवितव्य खासदारांच्या मनात काय आहे, त्यावर शहराध्यक्षांच्या इच्छेचे फलित अवलंबून आहे. भोईर शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चेने काँग्रेस वर्तुळात गोंधळाचे वातावरण आहे. भोईर समर्थक आणि विरोधक असे दोन गट असले, तरी निवडणुकीच्या दृष्टीने पक्षातील वातावरण एकदम थंड आहे. भोइरांचे पक्षांतर स्पष्ट झाल्यानंतरच चिंचवड की पिंपरी मतदारसंघ यावर काँग्रेसमधील हालचाली गतिमान होणार आहेत.
पिंपरीतील तीनही जागा राखण्याची व्यूहरचना करणाऱ्या अजितदादांच्या पक्षाचे सध्यातरी ‘तीन तेरा’ वाजले आहेत. लक्ष्मण जगताप, आझम पानसरे पक्ष सोडून गेल्याने दुबळ्या झालेल्या राष्ट्रवादीचे संघटनात्मक कामकाज थंडावले आहे. शहराध्यक्षांच्या विरोधात वातावरण तापले आहे. त्यांनी लोकसभेत धनुष्यबाण चालवल्याच्या तक्रारी झाल्याने बरेच रामायण घडले. विधानसभा चाचपणीसाठी आलेल्या निरीक्षकांसमोर मेळाव्याचा फज्जा उडाला. आमदार विलास लांडे व नगरसेवकांनीच शहराध्यक्षांवर हल्लाबोल केला, तेव्हा तेथेच पद सोडण्याची घोषणा शहराध्यक्षांनी केली. मात्र, निवडणुकीपर्यंत कोणताच बदल होणार नसल्याचे सांगून अंकुश काकडेंनी त्यावर पडदा पाडला. निवडणुकीत बहलांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. भोसरी, चिंचवडचे ‘सुभेदार’ त्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने पिंपरीपुरता झेंडा फडकावण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. आमदार अण्णा बनसोडे व त्यांच्यात सुप्त मतभेद असल्याने पक्षाची ‘नाजूक’ अडचण आहे. भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे समर्थक खाडेंना सुरुवातीपासून पक्षांतर्गत विरोध आहे. आता ‘गॉडफादर’ नसल्याने त्यांची वाटचाल कठीण आहे. पिंपरी मतदारसंघ जिंकावा, यासाठी आग्रही असलेल्या मुंडेंची इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी खाडेंवर आहे. मात्र, त्यांच्यासमोर पक्षांतर्गत आव्हान मोठे आहे. राज ठाकरे यांच्या मनसेचे चार नगरसेवक पालिकेत निवडून आले असले, तरी विधानसभेसाठी मनसेला अपेक्षित वातावरण नाही. शहराध्यक्ष मनोज साळुंके प्रसिद्धीपासून चार हात दूर असून आपल्या पदाचा राजीनामा स्वीकारावा, अशी इच्छा त्यांनी नेत्यांकडे व्यक्त केल्याचे सांगण्यात येते. दुसरीकडे पालिकेतील गटनेते अनंत कोऱ्हाळे चिंचवडसाठी शड्डू ठोकून तयार आहेत.
विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पिंपरीतील शहराध्यक्षांचे ‘राजकारण’
राजकीय वातावरण तापू लागले आहे. निवडणुकांमध्ये शहराध्यक्ष ‘सेनापती’च्या भूमिकेत असताना सेनापतींच्याच विरोधात सैन्य, असे राजकारण दिसून येत आहे.
First published on: 02-08-2014 at 02:45 IST
TOPICSकाँग्रेसCongressचिंचवडChinchwadनिवडणूक २०२४ElectionपिंपरीPimpriभारतीय जनता पार्टीBJPमनसेMNSराष्ट्रवादी काँग्रेस पक्षNCP
+ 3 More
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad election bjp mns shiv sena ncp congress