पिंपरी चिंचवडमधील वाकड येथे एका उच्चशिक्षित आणि अभियंता असलेल्या २० वर्षीय तरुणाने दोन घरात डल्ला मारल्याचे निष्पन्न झाले आहे. यात त्याने २ लाख २४ हजार रूपयांची सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. सुरज सुद्रिके (वय २०, वेणू नगर, वाकड) असे अटक केलेल्या अभियंत्याचे नाव आहे. विशेष म्हणजे त्याने स्वत:च्या घरातील दागिनेही चोरले होते. हे सर्व तो मौजमजा व मद्यप्राशन करण्यासाठी करत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज हा अभियंता असून त्याने स्वतःच्या घरात ऑगस्ट २०१६ मध्ये डल्ला मारत घरफोडीला सुरुवात केली. यात त्याने कानातील १५ ग्रॅमचे सोन्याचे झुमके चोरी केले. घरातील व्यक्तींनी याबाबद्दल वाकड पोलिसात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर परत मार्च महिन्यात घरफोडी करत रोख ५० हजार रुपये आणि ८० ग्रॅम सोन चोरी केले.
विशेष म्हणजे केवळ मित्रांसोबत दारूची पार्टी करण्यासाठी आणि मौजमजेसाठी घरफोड्या करत असल्याची माहिती सुरजने पोलिसांना दिली आहे. सुरज याला वाकड पोलिसांनी काळखडक येथून ताब्यात घेतले. तो बंद घरांवर लक्ष ठेऊन घरफोडी करायचा. खबऱ्याने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला पकडले. त्याच्याकडून एकूण दोन घरफोड्या उघडकीस आल्या आहेत. पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.
पिंपरी चिंचवड; पार्टीसाठी घरफोड्या करणारा अभियंता जेरबंद
सुरज हा अभियंता असून त्याने स्वतःच्या घरात ऑगस्ट २०१६ मध्ये डल्ला मारला.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 27-03-2017 at 19:33 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad engineer arrested for burglary