पिंपरी-चिंचवडचे बदली झालेले पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश शनिवारी सकाळी बारामतीला ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले. दोहोंमध्ये चर्चाही झाली. भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी चर्चा न करता कृष्ण प्रकाश निघून गेले. तर, पवार नियोजित कोल्हापूर दौऱ्यासाठी रवाना झाले.

पिंपरी पोलीस आयुक्तालयातून अवघ्या दीड वर्षात कृष्ण प्रकाश यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्या जागी नवे पोलीस आयुक्त म्हणून अंकुश शिंदे यांनी तत्काळ पदभार स्वीकारून कामकाजाला सुरूवातही केली. सुटीवर असताना आणि परदेशात गेले असताना अचानक बदली झाल्याने कृष्ण प्रकाश तीव्र नाराज आहेत. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या संमतीनेच बदली करण्यात आल्याच्या चर्चेमुळे, त्यांनी थेट मोठ्या साहेबांच्या (पवारांच्या) दरबारात हजेरी लावली असावी, असे सांगितले जाते.

शरद पवार शनिवारी सकाळी बारामतीत होते. कृष्ण प्रकाश यांनी त्यांची निवासस्थानी भेट घेऊन स्वत:ची कैफियत मांडली. त्यांच्यात काही वेळ चर्चा झाली. तथापि, त्याचा तपशील समजू शकला नाही. त्यानंतर, कृष्ण प्रकाश बाहेर आले. इतर वेळी प्रसारमाध्यमांना आर्वजून वेळ देणारे कृष्ण प्रकाश थेट मोटारीत बसून निघून गेले. थोड्याच वेळेत पवार यांचा ताफा कोल्हापूरकडे रवाना झाला. कृष्ण प्रकाश स्वत:ची बदली रद्द करण्यासाठी गेले असावेत, अशी अटकळ बांधली जात आहे.

Story img Loader