पिंपरी : …ढोल-ताशांचा दणदणाट…आकर्षक विद्युत रोषणाई… फुलांनी सजवलेल्या रथांची रेलचेल…लक्षवेधक चित्ररथ… गणपती बाप्पा मोरयाच्या अखंड जयघोषात पिंपरी-चिंचवडमध्ये गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात सुरू आहे. दुपारी चार वाजता मिरवणुकीला सुरूवात झाली. मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. चिंचवड, चापेकर चौकात महापालिकेच्या वतीने स्वागत कक्ष उभारण्यात आला आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, उपायुक्त स्वप्ना गोरे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर, उपायुक्त अण्णा बोदडे, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्या हस्ते गणेश मंडळांचे स्वागत करण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आनंदनगर येथील गिरीजात मित्र मंडळाची विसर्जन मिरवणूक दुपारी चार वाजता विसर्जन घाटाकडे रवाना झाली. त्यानंतर आठच्या सुमारास आनंदनगर मित्र मंडळाची विसर्जन मिरवणूक चौकात दाखल झाली. त्यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईचा रथ साकारला होता. बालवारकरी,संबळवादक सहभागी झाले होते.

हेही वाचा : पिंपरी-चिंचवड: १४ वाहनांची तोडफोड करणाऱ्या ‘त्या’ आरोपींची पोलिसांनी काढली धिंड

श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळाच्या मिरवणुकीत आरंभ ढोल ताशा पथक , बालवारकरी सहभागी झाले होते. विठ्ठलाचा रथ साकारला होता. तरुण मित्र मंडळाने भंडाऱ्याची उधळण करत पालखीतून मिरवणूक काढली. गांधी पेठ तालीम मित्र मंडळाच्या मिरवणुकीत शिवदर्शन ढोल ताशा पथक सहभागी झाले होते. श्रीराम मोरया दरबार देखाव्याचा चित्ररथ साकारला होता. मुंजोबा मित्र मंडळाने शिवपार्वती रथ साकारला होता. काळभैरवनाथ मित्र मंडळाने ‘रामरथ’ साकारला आहे. ‘पवनामाई आमची माता, आम्हीच तिचे रक्षणकर्ता’ असे मजकूर असलेला फलक लावता नदी संवर्धनाचा संदेश दिला. गजाक्ष ढोल ताशा पथक सहभागी झाले होते. ज्ञाप्रबोधिनीच्या १५० मुलांच्या ढोल ताशा पथकाने उत्कृष्ट सादरीकरण केले.

हेही वाचा : पुणे : मिरवणूक चालू असतानाच एका ठिणगीने पेट घेतला आणि…

पिंपरीत प्रथम फाईव्ह स्टार तरुण मंडळाचे विसर्जन झाले. त्यानंतर मोरया मित्र मंडळ गांधीनगर पिंपरी, सदानंद तरुण मित्र मंडळ, शिवशंकर मित्र मंडळ, हर्षल मित्र मंडळ पिंपरी कॅम्प, शिव शंभो मित्र मंडळ पिंपरी, श्री नव चैतन्य तरुण मंडळ पिंपरी, संग्राम मित्र मंडळ पिंपरी, शिव शक्ती तरुण मंडळ, सिद्धिविनायक तरुण मंडळ, कैलास मित्र मंडळ कैलास नगर पिंपरी, इंडीयन बॉय मित्र मंडळ, नव चैतन्य तरुण मित्र मंडळ, कोहिनूर मित्र मंडळ या मंडळांच्या गणपतीचे आतापर्यंत विसर्जन झाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad ganesh visarjan 2024 pune print news ggy 03 css