पिंपरी चिंचवड : आम्ही इथे भाई आहोत. कोणाची हिंमत नाही आमच्यासोबत भिडण्याची. कोणी आम्हाला आडवा आला तर आम्ही त्याचा ३०२ करू. अस म्हणत फुलेनगर आणि मोहन नगर येथे टोळक्याने दहशत माजवली. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी सुमित आणि अक्षय ला अटक केली आहे. घटने प्रकरणी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिलेच्या भाचीची छेड देखील काढल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्या काळे, सुमित कमलाकर दाभाडे, अक्षय राजू कापसे आणि प्रतीक या पाच जणांनी मोहन नगर आणि फुलेनगर येथे दुचाकीवरून जात असताना दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने मोठमोठ्याने हॉर्न वाजवून आम्हाला कोणी भिडू शकत नाही. कोणी भिडलंच तर आम्ही त्याला खाल्लास करू असं म्हणत दहशत माजवली. यामुळे रात्रीच्या सुमारास शतपावली करणारे नागरिक आपापल्या घरी गेले आणि दरवाजा लावून घेतला. याच दरम्यान, फिर्यादी दिसल्याने त्यांना आरोपी सुमित म्हणाला की तुझ्या मुलाला खूप माज आहे. आमची विकेट टाकायची तयारी केली होती.
आता आम्हीच तुझी विकेट टाकतो. असं म्हणत सुमितने जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर कोयता उभारला, तो सुदैवाने चुकवला असं तक्रारीत म्हटल आहे. त्यानंतर आरोपी प्रतीक ने फिर्यादी महिलेच्या भाचीला जवळ ओढून घेतले. या सर्व घटनेने महिला आणि त्यांची भाची भयभीत झाल्या होत्या त्यामुळे त्या आतील गल्लीत पळून गेल्या. या घटने प्रकरणी पिंपरी पोलिसांनी सुमित दाभाडे आणि अक्षय कापसेला अटक केली आहे.