जगातील सर्वात मोठ्या अॅमेझॉन जंगलात गेल्या काही दिवसांपासून भीषण आग लागलेली आहे. याचा परिणाम तेथील शहरांवर जाणवत असून २० टक्के ऑक्सिजन याच जंगलातून अवघ्या जगाला मिळतो. मात्र, तेच जंगल आज धुमसत आहे. परिणामी, अशा घटना भविष्यात पुन्हा घडू नयेत, जंगल संवर्धन केले पाहिजे असा संदेश घरगुती गणपतीच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवमधील पवार कुटुंबाने दिला आहे. हिरवळ, प्राणी आणि पक्ष्यांच्या सानिध्यात मधोमध गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे. येथील जंगल केवळ प्राण्यांचे आहे असं या देखाव्यात दाखवण्यात आलं आहे. हा देखावा पाहण्यासाठी अनेकजण गर्दी करत आहेत.
प्रभाकर पवार आणि अमृता पवार या पतीपत्नीने जंगल संवर्धनाचा देखावा सादर केला आहे. त्यांनी तब्बल तीन दिवस यावर काम केलं असून कागदी पुठ्यांपासून हे नैसर्गिक जंगल तयार केलंय. गेल्या काही दिवसांपासून अॅमेझॉन हे जगातील सर्वात मोठं जंगल आगीत होरपळून निघत आहे. कित्येक प्राणी, पक्ष्यांचा मृत्यू या आगीत झाला आहे. त्यामुळे जंगल संवर्धन केलं पाहिजे असा संदेश देण्यासाठी पवार कुटुंबाने हे पाऊल उचलले आहे. पवार कुटुंबातील घरगुती गणपती बाप्पाच्या आजूबाजूला सर्वत्र हिरवळ असून यात अनेक प्राणी आणि पक्षी आहेत. हे जंगल केवळ प्राण्यांच्या हक्काचं असून येथील देखाव्यात मनुष्याला हद्दपार करण्यात आलं आहे. हा सुंदर देखावा करण्यासाठी अवघा ५०० रुपयांचा खर्च आला.
दरवर्षी पवार कुटुंब वेगवेगळे सामाजिक संदेश देत असतं. यंदा या कुटुंबाने या देखाव्यातून जंगल संवर्धनाचा संदेश तर दिलाच आहे पण, ‘झाडे लावा झाडे जगवा’ असाही संदेश दिलाय. यामुळे नैसर्गिक आपत्ती येणार नाही असे पवार सांगतात. देखावा पर्यावरणपूरक असून गणपती बाप्पांची मूर्ती इकोफ्रेंडली आहे. देखावा पाहून दर्शनासाठी येणारे गणेशभक्त नक्कीच जंगल विषयावर विचार करतील हे मात्र खरं.