पिंपरी : राज्यातील उद्योग धंदे सुरक्षित राहावेत आणि शहरातील कामगार वर्गाला सन्मानाने जगता यावे यासाठी महाराष्ट्रात महायुतीचे सरकार पुन्हा एकदा येणे आवश्यक आहे. विकासाला डबल इंजिनाची ताकद मिळाली तर निश्चितच विकासाची गती वाढण्यात मदत होईल. महाविकास आघाडीच्या काळातच उद्योग महाराष्ट्राबाहेर गेले आहेत, असा आरोप गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली.
चिंचवडचे भाजप उमेदवार शंकर जगताप यांच्या प्राचारार्थ वाल्हेकरवाडी येथील आयोजित कामगार, उद्योजकांच्या संवाद स्नेह मेळाव्यात सावंत बोलत होते. उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर, शहर कार्याध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा : Video: पुण्यातील हडपसर भागातील जुन्या इमारतीत आग, लहान मुलांसह सात रहिवाशांची सुटका
सावंत म्हणाले, की उद्योजकांना ताकद देण्यासाठी महायुती सरकारने पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर भर दिला. रस्ते, रेल्वे, विमानतळ या सुविधा निर्माण करण्यात आल्या. यामुळे विदेशातील कंपन्यांचीही गुंतवणुकीसाठी पहिली पसंती महाराष्ट्र राज्यालाच मिळत आहे. हे देशातील आणि राज्यातील डबल इंजिन सरकारमुळेच शक्य झाले आहे. मध्यंतरी महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात राज्यातील उद्योग धंदे पुण्यातून बाहेर गेले, मात्र नंतर महायुती सरकारच्या काळात पुन्हा एकदा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने राज्यातील औद्योगिक गुंतवणुकीत वाढ झाली आहे.
हेही वाचा : स्वारगेट एसटी स्थानकात चोरट्यांचा उच्छाद, प्रवासी तरुणाकडील साडेसहा लाखांचे दागिने चोरीला
काँग्रेस सरकारच्या ६० वर्षांच्या राजवटीत देशातील कामगार वर्गाची पिळवणूक करण्यात आली. काँग्रेसच्या विकासाच्या अजेंड्यावर देशातील सर्वसामान्य कामगार वर्ग कधीच नव्हता. मात्र ज्यावेळी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सरकार आले. त्यावेळी कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवून खऱ्या अर्थाने देशातील कामगारांना न्याय आणि सन्मान देण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. देशभरातील कामगार वर्गासाठी कामगार कल्याण मंडळ आणि बांधकाम कामगार मंडळाच्या माध्यमातून प्रत्येक कामगारांसाठी कामगार ओळखपत्र देण्यात आले. या ओळखपत्राद्वारे मुलांचे शिक्षण, स्वतःचे हक्काचे घर आणि कामगारांच्या आरोग्यविषयक समस्यासाठीच्या सर्व शासकीय योजनांचा लाभ घेता येणार आहे. कामगारांना सन्मानाने कसे जगता येईल, यासाठी देशातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारने विविध योजनांची अंमलबजावणी केल्याचेही सावंत म्हणाले.