पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील निगडी पोलिसांनी सोनसाखळी चोरणाऱ्या टोळीला आणि चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या सराफास निगडी पोलिसांनी अटक केली आहे. उमेश सुरेश पेहरकर, अनुप उर्फ चिंग्या गोडाजी चव्हाण, सोमनाथ मधुकर चोबे आणि अक्षय हिराचंद त्रिभुवन अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. बाळासाहेब भागवत उदावंत असं चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या सराफाचं नाव आहे. आरोपीकडून १५ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आकुर्डी येथे आईसह मुलगी चालत जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोघांनी गळ्यातील चार तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून पळ काढला होता. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सोनसाखळी चोरांचा तपास निगडी पोलीस करत होते. या तपासासाठी निगडी पोलिसांनी एक पथक देखील तयार केला होत. या चोरांच्या मागावर असलेल्या पोलिसांनी तब्बल अडीचशे किलोमीटरच्या मार्गावरील साडेतीनशे चे चारशे सीसीटीव्ही तपासून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

छत्रपती संभाजी नगर मधील वैजापूर भागातुन आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांनी तीन दिवस सापळा चारून त्यांच्यावर नजर ठेवली होती. सर्वात आधी उमेश सुरेश पेहरकर ला ताब्यात घेण्यात आलं होतं. चौकशीमध्ये इतर तिघांची नाव निष्पन्न झाली. पुणे आणि पिंपरी- चिंचवड मध्ये सोनसाखळी चोरल्यानंतर ते छत्रपती संभाजी नगर मधील वैजापूर येथील बाळासाहेब भागवत उदावंत या सराफाला दागिने विकत असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाल आहे. आरोपींकडून आत्तापर्यंत सहा सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून १५ लाख ५७ हजार रुपयांचे १५ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमरीश देशमुख यांच्या पथकाने केली आहे.