पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सध्या ज्या नागरिकांची पाणीपट्टी थकीत आहे अशा मालमत्तेचे नळजोड तोडण्याची कारवाई सुरू आहे. महापालिकेच्या माध्यमातून याबाबत नागरिकांना थकीत पाणीपट्टी भरण्याचे वेळोवेळी ‘एसएमएस’ द्वारे व इतर माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे. परंतू, शहरातील नागरिकांचे आज गुरुवारी रात्री नऊ वाजता नळजोड तोडण्यात येईल, अशा आशयाचे येणारे ‘एसएमएस’ खोटे असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहरातील पाणीपट्टी थकबाकी असलेल्या नागरिकांचे नळजोड रात्री नऊ वाजता तोडण्यात येईल. देवेश जोशी, महापालिका अधिकारी या नावाने आणि ९३०९४४५८२४ या मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहनपर फसवणूक करणारा ‘एसएमएस’ पाठविण्यात येत आहे. असे ‘एसएमएस’ हे नागरिकांची फसवणूक करणारे असून याकडे नागरिकांनी दुर्लक्ष करावे, असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा…Video: चाकण शिक्रापूर मार्गावर कंटेनरची पोलिसांच्या मोटारीसह आठ वाहनांना धडक; पोलीस कर्मचारी, लहान मुलगी जखमी

कोणत्याही लिंकद्वारे कोणतेही ऍप्लिकेशन मोबाईलमध्ये डाऊनलोड करु नका

तुमच्या माहितीमध्ये बदल आहेत, तुम्ही माहिती बदल करण्यासाठी सदर ऍप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठीचे एसएमएस तुमच्या व्हाट्सअपवरती येत आहेत. तरी त्याप्रकारच्या लिंक, ऍप्लिकेशन डाऊनलोड न करता त्याकडे दुर्लक्ष करावे. आपणास आपल्या माहितीबाबत, पाणीपट्टीबाबत कोणत्याही प्रकारच्या शंका असल्यास महानगरपालिकेच्या ८८८८००६६६६ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करसंकलन विभागाद्वारे करण्यात आले आहे.

हेही वाचा…मराठी भाषा संवर्धनासाठीच सारं काही…

नागरिकांनी खोट्या एसएमएसकडे दुर्लक्ष करावे

महानगरपालिकेच्या करसंकलन विभागाकडून पाणीपट्टी वसुलीची मोहिम सुरु करण्यात आली आहे. नागरिकांना करसंकलन विभागाकडून थकीत पाणीपट्टी भरण्याचे अधिकृत क्रमांक व सिस्टिमवरुन एसएमएस करण्यात येत आहेत. आपणास कधीही कोणत्याही मोबाईल क्रमाकांवरुन पाणीपट्टी भरण्याचे आवाहन करण्यात येत नाही. तरी नागरिकांनी अशा क्रमांकावरुन आलेल्या एसएमएस कडे दुर्लक्ष करुन आर्थिक फसवणूक होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad is disconnecting water supply to properties with overdue water bills pune print news ggy 03 sud 02