सोन्याचे आकर्षण जगात सर्वात जास्त भारतीयांमध्ये आहे. सोन्याचा शर्ट घालून ओंगळवाणे प्रदर्शन करणारा देशात कुठे सापडणार नाही, तो पिंपरी-चिंचवडमध्ये आहे. लोकांना वाटते, माझी परवानगी घेऊनच इथे सगळे काही होते. मात्र, पिंपरी-चिंचवड ही माझी जहागिरी नाही, असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भोसरीत केले.
लाड सुवर्णकार समाजाच्या वतीने भोसरीतील अंकुशराव लांडगे नाटय़गृहात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर मोहिनी लांडे होत्या. याप्रसंगी आमदार विलास लांडे, नगरसेवक वसंत लोंढे, अजित गव्हाणे, नितीन लांडगे, जगदीश शेट्टी, श्रद्धा लांडे, विनया तापकीर, अनुराधा गोफणे, सुनीता गवळी, कैलास भांबुर्डेकर, संजय उदावंत आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, राज्यात पाच लाख सुवर्णकार आहेत. या समाजाचे ११२ नगरसेवक, १४ नगराध्यक्ष व आठ उपनगराध्यक्ष आहेत. त्यामुळे निर्णयप्रक्रियेत हा समाज आला आहे. चोरीचा माल खरेदी करणे, फसवणूक आदी प्रकारांत पोलिसांकडून खोटे गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचे निवेदन संघटनेने दिले आहे. याबाबत आपण व गृहमंत्री आर. आर. पाटील लक्ष घालू, कोणावर अन्याय होऊ देणार नाही. मात्र, सराफांनी देखील आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. पैशाच्या लालसेपोटी चुकीचे काही करू नका, प्रलोभनाला बळी पडू नका, अनोळखी व्यक्तींकडून सोने खरेदी करू नका. सोने लुटण्याचे अनेक प्रकार उघड होत आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही तसेच सुरक्षायंत्रणा ठेवावी. समाजाच्या कार्यालयासाठी पिंपरी प्राधिकरणाकडून जागा हवी असल्यास बाजारभावाप्रमाणे घ्यावी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यकर्त्यांच्या निवेदनाची दखल
राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राजेंद्र साळुंके यांनी शहरातील उद्योग स्थलांतरित होत असल्याची माहिती देणारे निवेदन अजितदादांना दिले. उद्योजकांची बैठक घेऊन तोडगा काढण्याची मागणी त्यात होती. अजितदादांनी भाषणाची सुरुवातच या मुद्यापासून केली. मंदीची लाट आहे. कर जास्त असल्याचे सांगत अनेक उद्योग शहराबाहेर जाऊ लागले आहेत. तेजी-मंदी सगळीकडेच आहे. मात्र, शहरात उद्योग राहिले पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी मांडली.