लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी: जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याचे पिंपरी-चिंचवड शहरात आगमन होत आहे. शहराच्या वतीने या सोहळ्याचे स्वागत करण्यासाठी महापालिका यंत्रणा सज्ज झाली आहे. पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने आयुक्त शेखर सिंह यांनी शहरातील विविध ठिकाणांची पाहणी केली.
वारीच्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने स्थापत्य, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, सुरक्षा व्यवस्थेबरोबरच यंदाची वारी पर्यावरणपूरक, प्लॅस्टिकमुक्त, हरितवारी करण्याच्या दृष्टीने नियोजनाबाबत संबंधित विभागांना त्यांनी सूचना दिल्या. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे या वेळी उपस्थित होते.
आणखी वाचा-खंडणीसाठी वित्तीय संस्थेतील व्यवस्थापकाचे अपहरण करणारे गजाआड
तुकोबांची पालखी आज आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात मुक्कामी असणार आहे. स्थापत्य, विद्युत, पाणीपुरवठा, आरोग्य, उद्यान, शिक्षण, सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन अशा विविध विभागांनी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन, पालखी मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम, तसेच पालखी मुक्काम, वारकरी निवास आणि पालखी मार्गावर पुरेशा प्रमाणात शौचालयांची व्यवस्था ठेवण्यात आली आहे. महापालिकेने निगडी येथे स्वागतकक्ष उभारला आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मार्ग, विसाव्याचे ठिकाण तसेच महापालिकेच्या स्वागत कक्षाच्या ठिकाणी तयारी पूर्ण झाली आहे. या वर्षी दिंडीप्रमुखांना कापडी पिशवी, प्रथमोपचार पेटी, संपर्क क्रमांक असलेली माहिती पुस्तिका, पुष्पहार आणि नारळ देऊन सत्कार करण्यात येणार आहे. वृक्षारोपण, वृक्षदिंडी, हरितवारी असे विविध उपक्रमदेखील महापालिका राबवणार आहे.