पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलातील अग्निशामक विमोचक (फायरमन रेस्क्युअर) पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेतून पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ऑनलाइन परीक्षेला सात, तर मैदानी परीक्षेला दोन महिने होऊन गेल्यानंतर महापालिकेने ही कार्यवाही केली आहे. पात्र १५० उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.पहिल्या दिवशी २५ फायरमन रुजू झाले आहेत.

महापालिकेच्या अग्निशामक दलाकडे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. शहराचा वाढता विस्तार आणि आगीच्या घटना पाहता या विभागातील अधिकारी आणि कर्मचारी वाढविण्याची गरज निर्माण झाल्याने महापालिका प्रशासनाने गेल्या वर्षी १५० फायरमनची भरती प्रक्रिया राबवली. या जागांसाठी दीड हजार अर्ज आले. परीक्षार्थींची २९ ऑगस्ट २०२४ रोजी ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. त्यात ८९५ उमेदवार उत्तीर्ण झाले. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने चाचणी घेण्यास नकार दिल्याने ही परीक्षा रखडली होती.

दि. २२ ते २४ जानेवारी या कालावधीत भोसरी येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलात शंभर गुणांची शारीरिक क्षमता मैदानी चाचणी घेण्यात आली. चाचणीनंतर ६४३ उमेदवार पात्र ठरले आहेत. कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर १५ दिवसांत अंतिम यादी जाहीर केली जाणार होती. मात्र, ती प्रसिद्ध होण्यापूर्वी आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची बैठक होणे आवश्यक होते. ही बैठक न झाल्याने भरती प्रक्रिया रखडली होती. अखेर ही बैठक झाल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने पात्र उमेदवार आणि प्रतीक्षा यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.

महिलांसाठी ४६ जागा, पात्र केवळ आठ

या भरतीत महिलांसाठी ४६ जागा होत्या. ४५ उमेदवारांनी परीक्षा दिली होती. त्यातील २० पात्र ठरल्या. मैदानी चाचणीस १७ महिला उपस्थित होत्या. त्यांपैकी आठ उमेदवार उत्तीर्ण झाल्या. त्यांची नावे अंतिम यादीत आली आहेत. त्या आठ महिला रुजू होऊ शकतात. उर्वरित ३८ जागांवर पुरुष उमेदवारांची भरती केली जाणार आहे.पात्र उमेदवार आणि प्रतीक्षायादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. पोलीस पडताळणी सुरू असून पहिल्या दिवशी २५ फायरमन रुजू झाले असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी सांगितले.