पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शास्तीकराच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आक्रमक झाले. त्यांनी महापौरांना घेराव घातला. तसेच गदारोळ केला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

विरोधी पक्ष नेते योगेश बहल, मंगला कदम, मयुर कलाटे, दत्ता साने या चार नगरसेवकांचे निलंबन करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात ६०० चौरस फुटांपर्यंतच्या बांधकामावरील शास्तीकर माफ करण्यात आला. हा विषय आज सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. परंतु राष्ट्रवादीने १००० चौरस फुटांपर्यंत शास्तीकर माफ करावा, अशी मागणी लावून धरली. यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. आक्रमक झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौर नितीन काळजे यांना घेराव घातला. तसेच सभागृहात गदारोळ केला. यामुळे राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचे निलंबन करण्यात आले. पुढील तीन सभांसाठी या नगरसेवकांचे निलंबन करण्यात आले आहे. या कारवाईनंतर शिवसेना आणि मनसेच्या सदस्यांनीही सभात्याग केला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या निलंबित नगरसेवकांनी सत्ताधारी भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. महापौर नितीन काळजे हे स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांच्या म्हणण्याप्रमाणे ते वागतात. सर्वसाधारण सभेत शास्तीकराविरोधात आम्ही मतदानाची मागणी केली होती. आमचा काहीही संबंध नसताना आम्हाला निलंबित केले आहे, असे विरोधी पक्षनेते बहल यांनी सांगितले. तर कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचे निलंबन मागे घेणार नाहीत, असा पवित्रा महापौर काळजे यांनी घेतला आहे. त्यामुळे पुढील सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Story img Loader