पिंपरी : विधानसभा निवडणुकीत महायुतीने पिंपरी-चिंचवडवरील पकड पुन्हा घट्ट केली. दोन भाजपचे, तर एक राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचा उमेदवार विजयी झाला. शहरातील तिन्ही जागा लढविणाऱ्या राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे पानिपत झाले. तिन्ही उमेदवारांचा दारुण पराभव झाला आहे. त्यामुळे शहरातील महाविकास आघाडीची वाटचाल खडतर झाली असून, आव्हाने वाढली आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत अस्तित्व राखण्यासाठी नेत्यांचा कस लागणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महायुतीने लोकसभेनंतर लगेच विधानसभेची तयारी सुरू केली. ‘ज्या पक्षाचा, विद्यमान आमदार, त्या पक्षाला जागा’ या सूत्रानुसार पिंपरी राष्ट्रवादी (अजित पवार), चिंचवड, भोसरी भाजपकडे कायम राहण्याचे निश्चित केले. त्यानुसार पक्षातील अंतर्गत नाराजी दूर करून उमेदवारांना प्रचार करण्यास सांगितले. दुसरीकडे, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत महाविकास आघाडीत कोणता मतदारसंघ कोणत्या पक्षाला याचा घोळ सुरू होता. महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित होईपर्यंत महायुतीच्या उमेदवारांची प्रचाराची एक फेरी पूर्ण झाली होती. परिणामी, शहरातील राजकीय परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही. पिंपरीतून राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे अण्णा बनसोडे, भोसरीतून भाजपचे महेश लांडगे पुन्हा विजयी झाले, तर चिंचवडमधून भाजपचेच शंकर जगताप लाखाच्या मताधिक्याने निवडून आले. पिंपरी, भोसरीत प्रस्थापितांविरोधात काहीशी नाराजी जाणवत होती. पक्षफुटीनंतर लोकसभा निवडणुकीवेळी शरद पवार यांना मिळालेली सहानुभूती आताही मिळेल असे महाविकास आघाडीकडून सांगितले जात होते. त्यावर अंदाज बांधले जात होते. पण, निकालावरून ते खोटे ठरले. महायुतीच्या तिन्ही उमेदवारांनी दणदणीत विजय मिळविला.

हेही वाचा – कोकणात जमीन खरेदीच्या आमिषाने लष्करी अधिकाऱ्याची फसवणूक, लष्करी अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

महायुतीने शहरातील वर्चस्व सिद्ध केल्यानंतर आता महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता होती. सत्तेतील बलाढ्य भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार), शिवसेना (शिंदे) या तीन पक्षांचा सामना करणे महाविकास आघाडीसमोर मोठे आव्हान असेल. पिंपरी आणि चिंचवडमधील बहुतांश माजी नगरसेवक अजित पवार यांच्यासोबत आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची या दोन मतदारसंघातील ताकत नगण्य आहे. भोसरीतील अनेक माजी नगरसेवक अजित गव्हाणे यांच्यासोबत आहेत. परंतु, गव्हाणे यांचा विधानसभेला पराभव झाल्याने या नगरसेवकांना भवितव्याची चिंता आहे. त्यामुळे सोबत आलेल्या माजी नगरसेवकांना एक ठेवणे आणि महापालिका निवडणुकीत निवडून आणण्याचे आव्हान गव्हाणे यांच्यासमोर असेल.

चिंचवडमध्ये पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीविरोधात बंडखोरी केल्यानंतर लोकसभेला तटस्थ राहिलेले शिवसेनेचे माजी नगरसेवक राहुल कलाटे यांना चिंचवडमधून राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने उमेदवारी दिली. परंतु, कलाटे यांचा चौथ्यांदा पराभव झाला. त्यामुळे आगामी काळात कलाटे कोणती भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे असेल. तर, सुलक्षणा शिलवंत-धर यांच्यासमोर नगरसेवक म्हणून पुन्हा निवडून येण्याचे आव्हान राहील. कारण, संत तुकारामनगर प्रभागात राष्ट्रवादीचे (अजित पवार) शहराध्यक्ष योगेश बहल यांचे वर्चस्व आहे.

हेही वाचा – पुणे : अमली पदार्थ विक्री प्रकरणात उच्चशिक्षित तरुण गजाआड, सिंहगड रस्ता परिसरातून २० लाखांचे अमली पदार्थ जप्त

पक्षफुटीनंतर शिवसेना (ठाकरे) पक्षाची शहरातील ताकत कमी झाली आहे. विधानसभेला शिवसेनेला शहरातील एकही मतदारसंघ मिळाला नाही. तर, काँग्रेसचा महापालिकेत एकही नगरसेवक नव्हता. काँग्रेस दोन गटांत विभागली गेली आहे. विधानसभा निवडणुकीत तिन्ही मतदारसंघांत अपयश आल्याने निराशेचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे आगामी काळात शहरात महाविकास आघाडीची वाटचाल खडतर असल्याचे दिसत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad mahavikas aghadi problem challenge of survival in the upcoming municipal elections pune print news ggy 03 ssb