आगामी महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक भाजपा नगरसेवक राष्ट्रवादीत येण्यास उत्सुक असल्याचं विधान आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. तसेच, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जबरदस्त हवा देशात होती आणि तेव्हा महाराष्ट्रात सत्तेचा कशा प्रकारे वापर झाला, हे सर्वांनी पाहिलेलं आहे, असं देखील अजित पवार यांनी बोलून दाखवलं. त्यांच्या हस्ते आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. ज्ञानशांती शाळेचे उद् घाटन करण्यात आले त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, भाजपाचे बरेच नगरसेवक संपर्कात आहेत. मी त्यांना असं सांगतो की ज्यांना कोणाला पक्षात यायचं आहे. तेव्हा, तुमचं डिस्कॉलिफिकेश होता कामा नये. ते जर झालं तर सहा वर्षांसाठी अपात्र होतात. आता जे पक्षात आले आहेत ते अपक्ष आहेत, अस अजित पवार म्हणाले आहेत.
तसेच, ते पुढे म्हणाले की, आम्ही साधू संत नाहीत, राजकारणी आहोत. महानगरपालिका ताब्यात असेल तर अधिक चांगली कामे होतात. पिंपरी-चिंचवडकरांना माहीत आहे गेल्या २५ वर्षात कसा विकास केला आहे. नगरसेवक आज भाजपामध्ये असले तरी त्यांना मीच संधी दिलेली आहे. माझ्या पक्षाच्या मार्फत तिकीट दिलेलं आहे. चढ-उतार येत असतात. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जबरदस्त हवा अवघ्या देशात होती. महाराष्ट्रातील सत्ता भाजपकडे होती. त्या सत्तेचा वापर कशा कशा पद्धतीने झाला हे सर्वांना माहीत आहे. वार्ड रचना करताना नगरसेवकाला कसा त्रास होईल हे पाहिलं जायचं. असलं खालच्या पातळीचे राजकारण मी केलं नाही.
याचबरोबर अजित पवार म्हणाले की, काम केले तर नागरिक निवडून देणार. याला वेगळा आणि तो भाग घ्या असं काही नसतं असं माझं मत असायचं. परंतु, त्यावेळेस इतकं काम करून देखील जनतेच्या दिलेल्या कौलामुळ विरोधी पक्षात बसावं लागलं. अशी खंत देखील अजित पवार यांनी बोलून दाखवली.