देशातील मतदानाचा टक्का वाढावा म्हणून सरकार व अनेक स्वयंसेवी संस्थांकडून सातत्याने मोठे प्रयत्न केले जातात. त्याचा सकारात्मक परिणामही काही प्रमाणात दिसून येतो. परंतु या मोहिमेत जनसहभागही तितकाच महत्वाचा असतो. हीच कल्पना मनात ठेऊन पिंपरी-चिंचवडमधील एका युवकाने चक्क आपल्या लग्नातच मतदान जनजागृती करून एक आदर्श निर्माण केला आहे. सचिन उत्तेकर आणि माधुरी चव्हाण यांचे शनिवारी (दि.११) दिघी येथे लग्न झाले. आपल्याला आशिर्वाद देण्यासाठी आलेल्यांना त्यांनी आगामी महापालिका निवडणुकीसाठी मतदान करण्याचे आवाहन केले. त्यांच्या या अभिनव उपक्रमाचे आलेल्या पाहुणेमंडळींनीही मोठे कौतुक केले व त्यांच्या आवाहनाला सादही दिली आणि लग्न मंडपातून जाताना प्रत्येकाने मतदानाचा आपला हक्क निभावणार असल्याचा विश्वासही या नवदाम्पत्याला दिला.
येरवडा येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन उत्तेकर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील दिघी येथील माधुरी चव्हाण यांचे शनिवारी लग्न झाले. लग्नापूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेची मतदान जनजागृती टीम सचिन यांना भेटली. या टीमने सचिन व माधुरी यांना आपल्या लग्न समारंभातून येणाऱ्या पाहुणेमंडळींना मतदानाचे आवाहन करण्याचा प्रस्ताव मांडला केले. ही कल्पना सचिन यांना आवडली. त्यांनी त्वरीत आपल्या सासरकडील मंडळींना याची माहिती दिली. लग्नाच्या माध्यमातून एक चांगला संदेश जाईल या हेतूने त्यांनीही लगेच या उपक्रमास परवानगी दिली. लग्न मंडपात त्यांना शुभेच्छा देण्यास येणाऱ्या प्रत्येक पाहुणे, मित्रमंडळींना ते मतदान करण्यास आवाहन करत होते. तसेच ज्यांची नावे मतदान पत्रिकेत नाहीत त्यांना नाव नोंदवण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले.
मतदान करून सुटी एन्जॉय करा
महापालिकेच्या मतदान जनजागृती टीमने हा प्रस्ताव ठेवल्यानंतर तो लगेच स्वीकारला. लग्नात काहीतरी वेगळे करता येईल व एका चांगला संदेशही देता येईल या उद्देशाने आम्ही हा उपक्रम राबवला. यासाठी सर्वांचे सहकार्य आणि प्रोत्साहन लाभले. मतदानासाठी मिळालेली सुटी मतदान करून एन्जॉय करा, असे आवाहन मी सर्वांना करतो. या उपक्रमाने समाजासाठी काही तरी केले याचा मला मोठा आनंद आहे.
– सचिन उत्तेकर