पिंपरी- चिंचवडमधील महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाचे राहुल जाधव यांचा विजय झाला आणि कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारासमोर एकच जल्लोष केला. अतिउत्साही कार्यकर्त्यांनी भंडारा उधळला. पण याचा फटका नागरिकांना बसला. पावसामुळे भंडाऱ्याचा चिखल झाला आणि यामुळे ११ दुचाकीस्वार घसरले.

पिंपरी- चिंचवड महापालिकेत शनिवारी महापौरपदासाठी निवडणूक झाली. यात भाजपाचे राहुल जाधव हे विजयी झाले. तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत सचिन चिंचवडे हे विजयी झाले. यामुळे जाधव आणि चिंचवडे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. अतिउत्साही कार्यकर्त्यांनी भंडारा उधळला. यासाठी भंडाऱ्याच्या गोण्या मोठ्या प्रमाणात आणल्या होत्या. महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच हा जल्लोष सुरु होता. यामुळे महानगरपालिकेसमोरील रस्त्यावर भंडाऱ्याचा सडा पडला होता. काही वेळातच पाऊस पडला आणि भंडाऱ्याचा चिखल झाला. यामुळे ११ दुचाकीस्वार घसरले. यात एका दिव्यांग व्यक्तीचाही समावेश होता.

कार्यकर्त्यांना असा जल्लोष करायचा असेल तर स्वतःच्या घरासमोर करावा, रस्त्यावर नको, अशी संतप्त प्रतिक्रिया पिंपरीच्या नागरिकांमध्ये उमटत आहे.

Story img Loader