पुण्याच्या कामशेत येथे अवैध धंद्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके हे रस्त्यावर उतरले. त्यावेळी शेकडोच्या संख्येने नागरिक कामशेत पोलीस ठाण्याच्या समोर जमा झाले होते. यावेळी धडक मोर्चा काढत त्यांनी कामशेत पोलिसांना इशारा दिला. पुणे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अवैध दारूमुळे तरुण पिढीचं आयुष्य उद्धवस्त होत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तसेच, सकाळी उठून व्यायाम करण्याऐवजी तरुण पिढी दारू कुठे मिळते हे शोधत आहे आणि ही वेळ आणण्याच काम पुणे ग्रामीण पोलिसांनी केल्याचा आरोप त्यांनी केला आणि जमिनीचे प्रकरणं देखील पोलिसांच्या जीवावर होत आहेत असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, एका तासाच्या आत अवैध दारू व्यवसायावर कारवाई करू असे आश्वासन कामशेत पोलिसांनी आमदार शेळके यांना नागरिकांच्या समोर दिलं. यावेळी आमदार आणि पोलीस समोरासमोर आले होते. तसेच, कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत असं काही आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्या, आम्ही कारवाई करू असे आवाहनही पोलिसांनी नागरिकांना केलं.
सत्ता बदलली म्हणून आमचे विचार बदलले असं नाही –
आमदार सुनील शेळके म्हणाले की, “अवैध धंदे तरुण पिढीला बिघडवण्याचं काम करत आहेत. सकाळी उठून व्यायाम करण्या ऐवजी दारू हातभट्टी कुठे मिळते हे शोधायची वेळ कामशेत पोलीस, पुणे ग्रामीण पोलिसांनी आणली आहे. आमची सत्ता बदलली म्हणून आमचे विचार बदलले असं नाही. सत्ता कोणाचीही असो, दीड वर्षांपासून पोलीस प्रशासनाला सांगतोय, हातभट्टी आणि गांजा हे गावागावात सुरू आहे ते तुम्ही बंद करा. अवघ्या २० रुपयांची दारू तरुण पिढीचं आयुष्य उद्धवस्त करत आहे.”
… अन्यथा येथील हातभट्टी अधिवेशनात घेऊन जाईल –
तसेच, यावेळी आमदार शेळके यांनी सोबत काही गावात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीच्या ठिकाणाहून दारू आणली होती, ती पोलिसांना दाखवत अनेक आरोप त्यांनी यावेळी केले. दीड – दोन वर्षात करोडो रुपयांची माया येथील पोलीस अधिकारी गोळा करतात. असा आरोप त्यांनी केला आहे. कामशेत पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला निलंबित करा, अवैध व्यवसाय कोणाच्या आशीर्वादाने चालतात याच उत्तर द्या!. असा प्रश्न त्यांनी कामशेत पोलिसांना केला. एका तासात अवैध धंदे बंद करा अन्यथा येथील हातभट्टी अधिवेशनात घेऊन जाईल, असा इशारा देखील त्यांनी दिला. पुढे ते म्हणाले की, “बाहेर चे गुंतवणूकदार जमिनीवर पोलिसांच्या जीवावर ताबा मिळवत आहेत. आम्हाला रक्षक हवा आहे भक्षक नको. प्रामाणिक अधिकाऱ्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू.” असे देखील ते म्हणाले आहेत.